अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांची परंपरा कायम ठेवत भाजपने महापालिकेतही विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शहराच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप राष्ट्रवादी महायुतीने शहराच्या राजकारणात ठोस पकड निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

प्रभाग क्रमांक सातमधून पुष्पां अनिल बोरुडे, तर प्रभाग क्रमांक सहामधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे भाजपचे तीन उमेदवार कोणताही सामना न होता विजयी ठरले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)नेही निवडणुकीत खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून कुमार वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून प्रकाश भागानगरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
एकूणच, निवडणूकपूर्व टप्प्यातच बिनविरोध विजयानं अहिल्यानगरच्या राजकारणात सत्ता एकहाती जाण्याचे संकेत मिळत आहेत. पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या रणनितीमुळे भाजपचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे.
भूतो न भविषयती अशी बिनविरोध निवड
या निवडणुकीत तब्बल पाच नगरसेवक बिनविरोध निवडून येणे ही घटना राजकीय वर्तुळात ‘भूतो न भविषयती’ अशी मानली जात आहे. निवडणूकपूर्व टप्प्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध यश मिळाल्याने महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचा अंदाज आला आहे.
निकालाबाबत ठाम विश्वास
येत्या पंधरा तारखेला जाहीर होणारा निकाल भाजप राष्ट्रवादी महायुतीचाच असेल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत व्यक्त केला जात आहे. बिनविरोध विजयामुळे महायुतीचे पारडे आधीच जड झाल्याचे चित्र आहे.
सहानुभूती डॉ.सुजय विखेंकडेच
खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला असला, तरी डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यानंतरही शहरासाठी सातत्याने काम सुरू ठेवले. विकासकामांकडे लक्ष देणे, विविध योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आणि नागरिकांशी थेट संपर्क ठेवणे या भूमिकेमुळे त्यांच्याविषयी शहरात सहानुभूती निर्माण झाली आहे. खासदार असताना राबवलेल्या विकासकामांचा ठसा आणि त्यानंतरही कायम राहिलेली सक्रियता याच जोरावर पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे बोलले जात आहे. यामुळे नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसते.
अहिल्यानगरच्या विकासाचा विश्वासार्ह चेहरा
अहिल्यानगर शहराचा विकास सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप हेच प्रभावीपणे करू शकतात, हे या निवडणूक प्रक्रियेतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची भावना राजकीय व सामाजिक स्तरावर व्यक्त होत आहे. एकूणच, बिनविरोध निवडी आणि निर्माण झालेली सहानुभूती यामुळे महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.





