अहमदनगर – दि २० फेब्रुवारी
अहमदनगर शहरात सध्या अंतर बँक क्रिकेट स्पर्धा सुरू असून दोन वर्ष नंतर पुन्हा एकदा मैदाने स्पर्धांमुळे गाजबजली आहेत.
अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आयोजित आंतर बँक क्रिक्रेट स्पर्धेत गतविजेत्या अहमदनगर शहर सहकारी बँकेने बँक ऑफ महाराष्ट्र ( बी ) संघावर दणकेबाज विजय मिळवला .
नाणेफेक जिंकून शहर बँकेचे कर्णधार किरण भंडारी यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली .आठ षटकांच्या या सामन्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या संघाने पहिले षटक निर्धाव टाकून चांगली सुरुवात केली . मात्र त्यानंतर सामन्याची सर्व सुत्रे अनिकेत खांदाट आणि किरण भंडारी यांनी हाती घेऊन बँक ऑफ महाराष्ट्राच्या गोलंदाजीची पिसे काढली .
अनिकेत खांदाट याने ३१ चेंडूत नाबाद ५८ धावा कुटल्या . किरण भंडारी याने दोन उत्तुंग षटकार मारत १६ चेंडूत ३२ धावा ठोकल्या आणि प्रतिस्पर्धी संघासमोर केवळ आठ षटकात १०१ धावांचा डोंगर उभा केला .
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र ( बी ) संघाची सुरूवात संथ झाली . योगेश पाठक आणि अनिकेत खांदाट यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव आणला . रोहन बाबर आणि आणि किरण डहाळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले . शहर बँकेचे राहुल मोहिरे , सागर गांधी , ऋषीकेश तांबोळी ,ऋषीकेश ब्रह्मे , गोरक्ष दिवटे , मिनीनाथ साळुंके आदिंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत विजयास हातभार लावला .
शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा , संचालक संजय घुले यांनी संपूर्ण सामना उपस्थित राहून खेळाडुंचा उत्साह वाढविला व सर्व संचालक मंडळाच्यावतीने संघाच्या विजयाबदद्ल शुभेच्छा दिल्या .
यावेळी सेवक प्रतिनिधी संजय मुळे , संतोष मखरे , मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वीर खान , वरिष्ठ अधिकारी दिनेश लोखंडे , आय . टी . विभाग प्रमुख सुनिल निंबाळकर , जयंत गायकवाड , डी वाय कुलकर्णी , शाखाधिकारी राजेंद्र गायकवाड , शाखाधिकारी पराग चावक आणि शहर बँकेचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .