नागपूर दि १ मार्च
ऐकावं ते नवलच कुत्र्याच्या भुंकन्याला कंटाळून दाद मागणीसाठी दोन वयोवृद्ध महिलांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
मालती व नलिनी राहगुडे या दोन वयोवृद्ध महिला नागपूर मधील त्रिमूर्तीनगर मध्ये राहतात. त्या दोघ्याही अविवाहित असल्याची माहिती आहे. शिवाय माईग्रेन आणि अपस्मार या आजारानं त्रस्त आहेत. धीरज डहाके हे त्यांच्या शेजारी राहतात. त्यांच्याकडे जर्मन शेफार्ड जातीचा कुत्रा आहे. तो दिवसभर भुंकतो. त्यामुळं आम्हा दोन्ही बहिणींना त्रास होतो, असं त्यांचं म्हणण आहे. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला डहाके कुटुंबीयांना अनेकदा विनंती केली. परंतु, त्यांनी यासंदर्भात कुठलाही ठोस उपाययोजना केली नाही.
त्यानंतर त्या महापालिकेकडे व पोलिसांकडेही दाद मागण्यासाठी गेल्या. तिथंही त्यांच्या तक्रारीचं निवारण झालं नाही. आम्ही आजारी आहोत. कुत्र्याच्या भुंकण्यामुळं त्रस्त आहोत. त्यामुळं या कुत्र्याचं भुंकणं बंद करा. यासाठी त्यांनी शेवटी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
याचिकाकर्त्या महिलांच्या वतीने अॅड. शेख सिबघतुल्ला जागीरदार यांनी कामकाज पाहिले.
मालकाने कुत्र्याला प्रशिक्षण द्यावे. त्याचे भुंकणे थांबवावे अन्यथा महापालिकेने त्याला आपल्या ताब्यात घ्यावे, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी मनपा प्रशासन, पोलीस आणि पशू संवर्धन विभाग यांना नोटीस बजावली आहे.
कुत्रा असल्याने तो भुंकणारचं. कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केली असेल किंवा कुणाचा चावा घेतला असेल, तर कारवाई करता येईल. पण, कुत्र्याचे भूंकणे कसे थांबविणार, असे उत्तर मनपाने आपल्या शपथपत्रात दिले आहे. त्यामुळं आता हे प्रकरण काय वळण घेतं ते पाहावं लागेल.