अहमदनगर दि १३ मार्च-
पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाविरोधात अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोलिस नाईकाने फौजदारी कारवाईसाठी खासगी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस नाईकाच्या सर्व्हिस बुकमध्ये परस्पर जात बदल्याने पोलिसाने थेट न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
माहिती अधिकारात सर्विस बुक अशी कागदपत्रे मागून त्यांच्या निदर्शनास आपल्या सर्विस बुक मध्ये जात रकाण्या समोर परस्पर काही बदल केल्याचे निदर्शनास अल्याने त्यांनी भिंगार पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती मात्र त्याची दखल न घेतल्याने अखेर शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली.
अहमदनगर जिल्हा पोलीस दलात कार्यकरत असलेले पोलिस नाईक राजू एकनाथ शिंदे हे 1989 रोजी पुणे शहर पोलिस दलात कॉन्स्टेबल या पदावर भरती झाले होते त्यांचा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्म-हिंदू व जात -बिगर मागास अशी होती. त्यांचे मूळ गाव हे जेऊर बायजाबाई (ता. नगर) असल्याने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात येण्याचा निर्णय घेतला.
अहमदनगर ग्रामीण पोलिस दलात ते ता. 24 मार्च 2000 रोजी रुजू झाले. शिंदे हे पोलीस मुख्यलयात कार्यरत असताना 8 मे 2008 रोजी त्यांच्यावर दंगल करणे, दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा सत्र न्यायालयाने 13 डिसेंबर 2018 रोजी त्यांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केले.
पोलिस नाईक राजू शिंदे यांनी पदोन्नती का मिळत नाही, याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यांनी लेखी पत्र दिले. त्यापत्रावर “त्यांच्यावरील दाखल गुन्हा तसेच वैध जात प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याने पदोन्नती रखडल्याचे कळविले’. त्यांनी माहिती अधिकाराचा वापर करून सर्व्हिस बुकची प्रत घेतली. या सर्व्हिस बुकवर त्यांच्या जातीपुढे भिल्ल असा उल्लेख करण्यात आला होता.
शिंदे यांनी जाती पुढे भिल्ल असा उल्लेख कोणत्या आधारे केला, याबाबतची माहिती वारंवार मागितली. त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही.
सर्व्हिस बुकवरील जात बदलण्याचा कोणताही अधिकार नसताना वरिष्ठ लिपिक डी. टी. शेंडे यांनी जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या हेतूने जात या रकान्यात भिल्ल असा उल्लेख केला. त्यामुळे पदोन्नती रखडली आहे. वेतन, भत्ते यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे न्यायालयात भा.दं.वि. कलम 467 अन्वये कारवाईसाठी वरिष्ठ लिपिक शेंडे यांच्याविरोधात खासगी फिर्याद दाखल केली आहे.
सामान्य नागरिक पोलिसांकडे तक्रार घेऊन न्याय मागण्यासाठी जात असतो मात्र या प्रकरणात एका पोलिसावर अन्याय होऊन सुद्धा त्याला पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने अखेर न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे हे विशेष. राजू शिंदे यांच्याविरोधात कोणाची तक्रार नसताना अथवा त्यांनी कोणताही विनंती अर्ज केला नसताना त्यांची जात का बदलली हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय.