📰 खबर अहिल्यानगरची
अहिल्यानगर प्रतिनिधी :
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सुधारित प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण करण्यात आले असून, या योजनेबाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, नागरिकांना आपली मते व आक्षेप नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम २६ (१) अन्वये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेने ७ मार्च २०२४ रोजीच्या ठरावानुसार सुधारित प्रारूप विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर केला होता. त्यानंतर नगररचना विभागाने आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून विकास योजनेचे नकाशे व अहवाल महानगरपालिकेकडे सादर केले.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ठराव क्रमांक २३ द्वारे काही बदलांसह प्रारूप विकास योजना प्रसिद्ध करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार नगररचना अधिकारी यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी सुधारित नकाशे व अहवाल प्रसिद्धीसाठी सादर केले.
महानगरपालिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, विकास योजनेचे नकाशे व अहवाल नागरिकांच्या पाहणीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. यामध्ये आयुक्त, अहिल्यानगर महानगरपालिका कार्यालय तसेच उपसंचालक, नगररचना (विकास योजना विशेष घटक) कार्यालयाचा समावेश आहे.

योजनेतील कोणत्याही तरतुदीबाबत सूचना अथवा हरकती असल्यास त्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील प्रसिद्धी दिनांकापासून ३० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कारणांसह आयुक्त, अहिल्यानगर महानगरपालिका यांच्याकडे सादर कराव्या लागणार आहेत. निर्धारित मुदतीत प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींचा विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आरक्षणाचा प्रकार क्षेत्रफळ व संख्या
क्रीडांगणासाठी सर्वाधिक १०३.५३ हेक्टरवर ९० आरक्षणे, एएमटी बस स्थानकासाठी २.७२ हेक्टरवर ७ आरक्षणे, दफनभूमीसाठी ७ हेक्टरवर ७ आरक्षणे, स्मशानभूमीसाठी ८.४६ हेक्टरवर १० आरक्षणे, सामुदायिक किंवा बहुउद्देशीय सभागृहांसाठी ५.८३ हेक्टरवर १० आरक्षणे, शैक्षणिक सुविधांसाठी २६.२२ हेक्टरवर ४० आरक्षणे, अग्निशमन केंद्रासाठी १.२३ हेक्टरवर ३ आरक्षणे, उद्यान व बगीच्यासाठी ८२.४४ हेक्टरवर ८६ आरक्षणे, आरोग्य सुविधांसाठी १०.६४ हेक्टरवर २८ आरक्षणे, ग्रंथालयांसाठी ०.८५ हेक्टरवर ११ आरक्षणे, महानगरपालिका प्रयोजनासाठी ११.४३ हेक्टरवर ३८ आरक्षणे, वाहनतळासाठी १५.८२ हेक्टरवर ३२ आरक्षणे, मैला शुद्धीकरण केंद्रासाठी १०.२५ हेक्टरवर ४ आरक्षणे, घनकचरा व्यवस्थापन स्थळासाठी १३.०४ हेक्टरवर ६ आरक्षण, नगर भवनासाठी ५.५३ हेक्टरवर ४ आरक्षणे, भाजी मंडई, खरेदी केंद्र किंवा बाजारासाठी ३१.०७ हेक्टरवर ६० आरक्षणे, पाणी उपसा केंद्रासाठी ०.२२ हेक्टरवर २ आरक्षणे आहेत. या व्यतिरिक्त इतर सार्वजनिक कारणांसाठी ७८.९६ हेक्टरवर ४१ आरक्षणे ठेवण्यात आली आहेत. एकूण ४७९ आरक्षणे प्रस्तावित असून त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ ४१५.९५ हेक्टर इतके आहे.
📌”अहिल्यानगरच्या भविष्यातील विकासाचा आराखडा नागरिकांसाठी खुला; सूचना व हरकतींसाठी ३० दिवसांची संधी.”
— यशवंत डांगे, आयुक्त, अहिल्यानगर महानगरपालिका



