अहिल्यानगर दि.१५ नोहेंबर
नगर मनमाड रोड वरील डी मार्ट समोरील चौकात अपघात होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या चौकात सध्या निवडणूक आयोगाच्या सुचने नुसार पोलीस आणि महसूल प्रशासन संयुक्तपणे वाहनांची तपासणी करत असतात त्यासाठी रोडवर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या बॅरिकेट्सला धडकून तरुण खाली पडल्यानंतर मागून आलेल्या भरधाव वेगात असलेल्या डंपरने तरुणाला चिरडून डंपर चालक पळून गेला त्यामुळे दुचाकी वरून खाली पडलेला तरुण जागेवर मृत्युमुखी पडला आहे.
हा अपघात निवडणूक आयोगाच्या पथकामुळे झाला असल्याचा आरोप या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला असून जेव्हा अपघात झाला तेव्हा पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचारी शेजारी असलेल्या एका राहूटी मध्ये बसले होते.त्यामुळे अपघात झाल्यानंतर काही नागरिक त्यांना माहिती देण्यासाठी त्या राहुटी मध्ये गेल्यावर त्या ठिकाणी असलेला एक कर्मचारी हसत हसत काय झाले विचारत होता त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. हा अपघात या रोडवर लावलेल्या बॅरिकेट्स मुळे झाला असून या ठिकाणी असलेल्या पथकावर कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. अपघाता मध्ये मयत झालेला तरुण हा वैदुवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून गाडीच्या नंबर वरून पोलीस मयत तरुणाचा पत्ता शोधत आहे.