खबर अहिल्यानगरची
अहिल्यानगर :
शहरातील पाईपलाईन रोड सावेडी परिसरात एका नामांकित वकिलाला त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने आणि सर्च रिपोर्टमध्ये क्युरी काढल्याने संबंधित एजंट नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. या वादानंतर सावेडी परिसरातील एका नगरसेवकाने मध्यस्थी करून प्रकरण मिटवल्याचीही चर्चा आहे. मात्र, या घटनेबाबत अधिकृत पोलिस तक्रार दाखल झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

*नेमका वाद कशावरून?*
मिळालेल्या माहितीनुसार, पाइपलाइन रोड परिसरात एक नामांकित वकील जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी आवश्यक कायदेशीर दस्तऐवज तयार करण्याचे काम करतात. सावेडी परिसरातील अनेक बांधकाम व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिक जागा आणि घरांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कागदपत्रांसाठी त्यांच्याकडे येत असल्याचे सांगितले जाते.
अशा व्यवहारांमध्ये जमिनीची मालकी, संबंधित कागदपत्रे आणि अनेक वर्षांचे सर्च रिपोर्ट तपासणे आवश्यक असते. या प्रक्रियेदरम्यान एका जागेच्या दस्तऐवजांमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने वकिलांनी सर्च रिपोर्टमध्ये क्युरी काढल्याचे समजते.
याच कारणावरून सावेडी परिसरातील एका जागा खरेदी-विक्री एजंटचा वकिलांसोबत वाद झाल्याची चर्चा आहे.
कार्यालयात जाऊन शिवीगाळ केल्याचा आरोप
कागदपत्रांमधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्यामुळे संबंधित एजंटचा व्यवहार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाल्याने तो संतप्त झाला आणि त्याने थेट वकिलांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे.
वकिलांचे काम उपलब्ध कागदपत्रांची तपासणी करून कायदेशीर बाबी निदर्शनास आणून देणे हे असते. अशा परिस्थितीत कागदपत्रांतील त्रुटी दाखवून दिल्याच्या कारणावरून वकिलांना धमकावले जात असेल, तर हा प्रकार कायदेशीर कामकाजाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारा ठरू शकतो.
*नगरसेवकाच्या मध्यस्थीने वाद मिटल्याची चर्चा*
या कथित प्रकारानंतर सावेडी परिसरातील एका नगरसेवकाने मध्यस्थी केल्याने वाद मिटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले नसल्याची माहिती समोर येत आहे. तथापि, या प्रकरणाची अधिकृत नोंद, संबंधितांची बाजू आणि पोलिसांकडून कोणती कारवाई झाली आहे का, याबाबत स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

*वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर*
वकिली व्यवसायात अनेकदा जमिनीचे व्यवहार, मालमत्तेचे वाद आणि कागदपत्रांमधील त्रुटी यांसारख्या संवेदनशील विषयांवर काम करावे लागते. अशा वेळी कायदेशीर बाबी स्पष्ट करणाऱ्या वकिलांवर दबाव आणण्याचा किंवा त्यांना धमकावण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनतो.
या पार्श्वभूमीवर वकिलांना त्यांच्या व्यावसायिक कर्तव्याचे पालन करताना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे. वकिलांच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदेशीर तरतुदींची गरज आणि वकिलांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी पुन्हा चर्चेत येऊ शकते.



