अहमदनगर दि.८ डिसेंबर
येथील मनमाडरोड – अहिल्याबाई होळकर रोडवरील ‘कॉम्रेड गोविंद पानसरे चौक’ येथे बेकायदेशिर फ्लेक्सबोर्ड लावून चौक विद्रुपीकरण करणारे आरोग्यसमिती अध्यक्ष डॉ. सागर बोरूडे यांच्यावर ‘चौक विद्रुपीकरणाचा’ गुन्हा दाखल करून चौकात ‘कॉम्रेड गोविंद पानसरे चौक’ नावाचा बोर्ड लावावा तसेच चौकात बेकायदेशिर प्रचारी व जाहीरात फ्लेक्स लावण्यावर कायमस्वरूपी बंदी कराव, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे केली आहे.
मागणीमधे त्यांनी म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिका आणि सन फार्मा कंपनी यांनी संयुक्तपणे सुशोभित केलेला तसेच तात्कालिन महापौर अभिषेक कळमकर यांच्या कार्यकाळात नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे आणि कामगार संघटना महासंघ तसेच शहर जिल्ह्यातील कॉम्रेड गोविंद पानसरेप्रेमींनी मागणी करून देशातील महत्वाचे शेतकरी कामगार नेते ‘कॉम्रेड गोविंद पानसरे चौक’ असे मनपा सभेत ठराव मंजूर करून नाव दिलेल्या चौकात काल रात्रीपासून महानगरपालिका ‘स्वयंघोषित आरोग्य समिती’ अध्यक्ष डॉ. सागर बोरूडे यांचा प्रचाराचा फ्लेक्सबोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डला बांधलेले रंगीत दोऱ्या चौकातील शुभोभिकरणास आडव्या तिडव्या बांधलेल्या आहेत. या प्रचारी फ्लेक्स बोर्डमुळे मुळ शुभोभिकरणाचे विद्रुपीकरण झालेले आहे.
या विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करून चौकात ‘कॉम्रेड गोविंद पानसरे चौक’ या नावाचा बोर्ड लावावा तसेच केलेले विद्रुपीकरण तात्काळ काढून घेऊन यापुढे चौक सुशोभिकरणास कोणताच प्रचारी अथवा जाहीरात फ्लेक्सबोर्ड लावुन विद्रुपीकरण होऊ नये याची मनपाने काळजी घेण्याची विनंती केली आहे.