अहमदनगर दि.६ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील नागरिकांकडे तब्बल दोनशे कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर थकला आहे. थकबाकीदार ही थकबाकी भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता थकबाकीदार मालमत्ता धारकांचे नावे चौका चौकात फ्लेक्स लावून झळकवले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील मालमत्ताधारकांकडील सुमारे दोनशे कोटी रुपयांची थकबाकी वसूल करताना महापालिका प्रशासनाने वेळोवेळी शस्ती माफी देऊनही आणि आवाहन करूनही थकबाकी भरण्यास मालमत्ताधारक पुढे आलेले नाहीत. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी थकबाकी भरण्याचे वेळोवेळी आवाहनही केले. परंतू थकबाकीदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर आयुक्त डॉ. जावळे यांनी थकबाकीदारांचे नावे चौका चौकात जाहीर करणार असल्याचेही सांगितले होते मात्र त्यावरही अनेकांनी पैसे भरले नाहीत त्यामुळे अखेर महानगरपालिकेने मोठ्या थकबाकीदारांची नावे फ्लेक्स बोर्ड लाऊन चौकाचौकात लावली आहेत.