अहिल्यानगर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित असून वेळोवेळी निवेदन, पत्रव्यवहार आणि चर्चेनंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मनप प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देत २८ मे रोजी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने युनियनच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा बैठकीचे आयोजन न करता मनमानी पद्धतीने लेखी उत्तर कळवले. मात्र मनपा कर्मचारी युनियनंना हे मान्य नसून महापालिकेसमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन करण्यावर युनियन ठाम आहे. जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील असा इशारा युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर व सचिव आनंद वायकर यांनी दिला आहे.
मनपा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी होणाऱ्या आंदोलनाच्या नियोजनाची बैठक कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्या ंमध्ये संपन्न झाली. यावेळी युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल सचिव आनंद वायकर, अनंत लोखंडे, राहुल साबळे, बलराज गायकवाड, दिपक मोहिते, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, ऋषिकेश भालेराव, संदिप चव्हाण, नंदकुमार नेमाणे, अमोल लहारे, अजय सौदे, विजय कोतकर, प्रफुल्ल लोंढे, बाळासाहेब व्यापारी, सागर साळुंके, प्रकाश साठे, भरत सारवान, विठ्ठल उमाप, सुर्यभान देवघडे, सखाराम पवार, अंतवन क्षेत्रे, अकिल सय्यद, राजेंद्र वाघमारे, अजित तारु, भास्कर आकुबत्तीन आदि उपस्थित होते.
कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५०६ कोर्ट कर्मचाऱ्यांना ५ व्या वेतन आयोगाचा फरक २४ समान हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय झाला असून, केवळ एक हप्ता दिवाळीपूर्वी अदा करण्यात आला आहे. उर्वरित हप्ते अद्याप देण्यात आलेले नाहीत. याशिवाय, हद्दवाढीतील कामगारांचे फरकाचे तक्ते अद्याप तयार झालेले नाहीत. ६ व्या वेतन आयोगाचे दोन हप्ते कामगारांना मिळालेले नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही फरकाची रक्कम दिलेली नाही. कालबद्ध पदोन्नतीच्या फरकाची रक्कम गेल्या ८-१० वर्षांपासून थांबलेली आहे. वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले तात्काळ अदा करणे व ती भविष्यात दरमहा पगारासोबत देणे, निवृत्ती वेतन अंशदान योजनेतील २५० लाभार्थ्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करणे, आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेवर जमा करणे, या मागण्या रखडलेल्या असून, एल.जी.एस.-एल.एस.जी.डी. परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना जादा वेतनवाढ देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, तसेच निवड समिती गठित करून पात्र कर्मचाऱ्यांना बढती आणि कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. आरोग्य विभागातील RCH व NUHM कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ देणे, तसेच महासभेच्या ठरावानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ मंजुरीसाठी पाठवावा, अशीही मागणी कामगार युनियनच्या वतीने महापालिका आयुक्त यांच्या कडे निवेदनाद्वारे केली असून जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत धरणे अंदोलन सुरू राहिल. असा इशारा युनियनचे वतीने महापालिका प्रशासनाला देण्यात आला.