अहमदनगर दि.१३ एप्रिल
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रणधुमाळी सुरू असून या रणधुमाळीत आता सर्वच पक्षांची चांगलीच कस लागणार आहे. कारण कोरोना नंतर अनेक वर्षांनी निवडणुका होत असल्याने कार्यकर्त्यांसह नेत्यांच्या अंगातही उत्साह संचारलेला आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या चांगलीच चुरस पाहायला मिळत असून नेहमीप्रमाणे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी पारंपारिक लढत पाहिला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी 2019 अस्तित्वात आली मात्र नगर तालुक्याच्या राजकारणात ही महाविकास आघाडी अनेक वर्षांपासून भाजप विरुद्ध लढा देत आहे. त्यामुळे दर वेळेस नगर तालुक्यात सर्वच निवडणुका या चुरशीच्या होत असतात.
कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अधिपत्याखाली आहे. पुन्हा या बाजार समितीवर आपली सत्ता मिळवण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी चांगलीच कंबर कसली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा 15 एप्रिल रोजी नगर शहरातील निशा लॉन येथे होणार आहे. या मेळाव्याचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. कारण या पोस्टवर अहमदनगर शहरातील जुने राजकीय व्यक्तिमत्व आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांचा फोटो झळकल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. हा मेळावा भारतीय जनता पार्टीने आयोजित केला असून खासदार सुजय विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. या पोस्टरवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही फोटो असून दुसऱ्या बाजूला भानुदास कोतकर यांचा फोटो लागल्याने नगर तालुक्यात हा एक चर्चेचा विषय झालाय.