अहमदनगर दि. ५ डिसेंबर
हवा तेज चलता है दिनकर राव..टोपी संभालो.. वर्णा उड जयेगी… हा डायलॉग अग्निपथ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या तोंडून आपण ऐकला होता. मात्र आता सध्या भाजपची हवा चांगलीच तेज झाली असून नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता अनेकांच्या टोप्या उडू शकतात अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे. या हवेचा झटका आता नगर शहरालाही लागू शकतो आगामी वर्षात लोकसभा, विधानसभा आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि अहमदनगर शहराची महानगरपालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपची हवा आता चांगलीच तेज होत असून या हवेत अनेक इतर पक्षात असणारे नेते, कार्यकर्ते आजी-माजी नगरसेवक भाजपच्या गोटात जाऊ शकतात अशा हालचाली सध्या नगर शहरात सुरू झाल्या आहेत.
लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान मधल्या काळात महानगरपालिकेची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ शकते असा अंदाज सध्या बांधला जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक आजी-माजी नगरसेवकांनी आपला पत्ता सेट करण्यासाठी आणि निवडून येण्याच्या दृष्टीने भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
अहमदनगर महानगरपालिकेच्या काही माजी नगरसेवकांनी याबाबत चाचपणी सुरू केली असून जर भाजपच्या नगर शहरातील पदाधिकारी आणि वरिष्ठांकडून कडून ग्रीन सिग्नल मिळाला तर पुढील काही आठवड्यात नगर शहरातील काही माजी नगरसेवक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशा हालचाली सध्या जोरात सुरू आहेत.
मात्र भाजपचे वरिष्ठ आणि नगर शहरातील पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच हा प्रवेश फायनल होऊ शकतो त्यासाठी सध्या चर्चासत्र आणि चाचपणी सुरू आहे. मात्र सध्या तरी भाजपची हवा तेज चालू असल्याने इतर पक्षातील नेत्यांना कार्यकर्ते आणि पदाधिकारी सांभाळणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचा डायलॉग सध्यातरी भाजपला आणि शहराच्या राजकारणाला चांगलाच लागू पडतोय.