अहिल्यानगर – महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन ६८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होऊन महापौर व उपमहापौर यांची निवड झाली आहे. आता पहिल्या सभेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार ६ स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी शासन अध्यादेशानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचीच शिफारस संबंधित पक्षांच्या गटनेत्यांना करावी लागणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

राजकीय पक्षांच्या बलाबलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तीन, भारतीय जनता पक्षाचे दोन शिवसेनेचा एक सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून निवडला जाणार आहे. नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत सदस्य) म्हणून नियुक्त होण्यासाठी राज्यात नोंदणीकृत असलेला डॉक्टर, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता किंवा मुख्याध्यापक, सनदी लेखापाल (सीए), पदवीधारक अभियंता, वकील, महानगरपालिका किंवा नगरपरिषदेत मुख्य अधिकारी, सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम केलेला निवृत्त अधिकारी अथवा नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पदाधिकारी या घटकांपैकी एका घटकात किमान पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असलेला व्यक्ती पात्र ठरणार आहे.
संबंधित राजकीय पक्षाचा गटनेता आयुक्तांकडे पात्र उमेदवारांची शिफारस करतील. आयुक्तांच्या छाननीनंतर महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सभेत या स्वीकृत सदस्यांची घोषणा केली जाते. नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपध्दती) नियम, २०१० च्या नियम ४(छ) नुसार, महानगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाजकल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम, १९५० खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षाचा अनुभव असेलली असेल, या तरतूदीनुसार संबंधित व्यक्तीस धर्मादाय आयुक्तांनी अधिकृतरीत्या मान्यता दिल्यापासून समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा किमान पाच वर्षाचा अनुभव अपेक्षित असल्याचेही आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही व्यक्तीला थेट किंवा संस्थेमार्फत स्वतःच्या नावाची शिफारस करता येणार नाही. संबंधित राजकीय पक्षाच्या गटनेत्यांनाच स्वीकृत सदस्य पदासाठी नावांची शिफारस करता येईल, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.