अहमदनगर दि.१० नोव्हेंबर
अहमदनगर शहरात रात्री दुचाकी वर एकट्याने प्रवास करायचा तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो एवढी दहशत नगर शहरातील भटक्या श्वानांची
झाली आहे.नगर शहरातील चौका चौकांमध्ये रात्री बारानंतर फक्त भटक्या श्वानांचे साम्राज्य असते दिवसा हे श्वान आपल्याला दिसून येत नाही मात्र रात्री बारानंतर प्रत्येक चौकात किमान दहा ते बारा भटके कुत्रे आढळून येतात.
अहमदनगर महानगरपालिकेने गेल्या काही वर्षांपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका एका खाजगी संस्थेला दिला आहे मात्र निर्बीजीकरण होत असताना सुद्धा कुत्र्यांना पिल्ले कुठून होतात हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. या श्वानांचे पिल्लांचे खरे बाप कोण असाच सवाल आता नगरकर विचारू लागले आहेत. श्वानांचे निर्बीजीकरण केल्यानंतर त्यांना पिल्ले होऊ शकत नाही मग हे पिल्ले होतात कसे आणि श्वानांचे खरंच निर्बीजीकरण होते का? असा सवाल उठत आहे की कागदावरच हा प्रकार सुरू असून लाखो रुपये महापालिकेच्या माध्यमातून खर्च होत आहेत ! हे सर्व पैसे जनतेच्या खिशातील पैसे असून हा पैसा वायफळ तर जात नसेल ना कारण नगर शहरात ठीक ठिकाणी श्वानांचे छोटे छोटे पिल्ले आढळून येतात मग निर्बीजीकरण कोणाचे होतेय?
या भटक्या श्वानांमुळे अहमदनगर शहरात याआधी लहान मुले वयोवृद्ध यांचे जीव गेले आहेत तर हे कुत्रे मागे लागल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले आहेत मात्र या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही.
लहान मुले पिंजऱ्यात अन् कुत्री मोकाट’ अशी शहरातील परिस्थिती आहे. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुलांसह मोठ्यांनाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. नागरिकांना सुरक्षा देता येत नसेल, तर नगरसेविका म्हणून काम करण्याचा आमचा काय उपयोग, असा सवाल करत नगरसेविका रूपाली वारे यांनी या प्रश्नाला वाचा फोडली होती.
भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पालिका हद्दीत शहरातील विविध भागात डंपिंग ग्राऊंड,कचरा कुंड्यांचा परिसर, चिकन आणि मटनाची
दुकाने, नागरी वस्ती मध्ये भटकी कुत्र्यांचा वावर
वाढला आहे. हे भटके कुत्रे चालत जाणारे लहान मुले
आणि भरधाव जाणारे रिक्षा कार आणि दुचाकी
स्वरांचा पाठलाग करत असून लहान मुले आणि
दुचाकी स्वारांना चावा घेतल्याच्या घटनेत वाढ
झाल्याचे चित्र आहे.
२०२२ मध्ये शहर व उपनगरांत मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर एका खाजगी संस्थेला ठेका देऊन महापालिकेने तब्बल चार कोटी ७५ लाख रुपयांची उधळपट्टी केली होती. प्रत्यक्षात निर्बीजीकरण करून किती कुत्र्यांना बिल्ले लावले, याची कोणतीच माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊन सुद्धा त्यानंतर सर्वच नेते गप्प झाले होते. मात्र हे सर्व नेते गप्प का बसले याचे कारण अद्यापही कळले नाही मात्र नगरकरांचा कोट्यावधींचा पैसा मात्र नाहक खर्च झाला.
2023 मध्ये सुद्धा पुन्हा त्याच संस्थेला ठेका देऊन श्वानांचे नसबंदी सुरू झाली आहे ‘पिपल्स फॉर ॲनिमल’ ही संस्था महापालिकेकडून एका श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी ९५० रूपये देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमण्यात आलेली उपायुक्तांची समितीही अद्याप कागदावरच आहे.
या संस्थेला पुन्हा हे काम देवू नये, अशी मागणी शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने केली होती. एका पक्षाचा पदाधिकारी या संस्थेत ‘शॅडो’ पार्टनर असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला होता असे असतानाही याच संस्थेला पुन्हा निर्बिजीकरणाचा ठेका देण्यात आला हे विशेष आहे. तसेच नगरसेवक ही नंतर गप्प झाले आहेत त्यामुळे या ठेक्याचे गौडबंगाल काही कळण्याच्या पलीकडे गेले आहे