अहमदनगर दिनांक 23 सप्टेंबर
गेल्या दोन वर्षापासून भारतासह महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचं सावट असल्याने दोन वर्षात गणपती उत्सव हा सरकारी निर्बंधात पार पडला होता. त्यामुळे दोन वर्ष गणपती उत्सव हा शांततेत साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षीचा गणपती उत्सव हा निर्बंध मुक्त झाला धुमधडाक्यात पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध कार्यक्रम राबवले होते. मोठे मोठे मंडप त्यानंतर देखावे तसेच सुशोभीकरण यामुळे यावर्षीचा गणपती उत्सव चांगलाच उत्साहात साजरा झाल्याचे चित्र नगर शहरात दिसून आले. मात्र या उत्सवाला साजरा करण्यासाठी जी वर्गणी घेतली जाते ती वर्गणी वसुली करण्याची दडपशाही अजूनही सुरू आहे.
गणपती विसर्जन होऊन दोन आठवडे झाले तरी अजून काही व्यापाऱ्यांकडून वर्गणी वसूल करण्याचा फंडा काही लोक करत असून यामुळे आता व्यापारी त्रस्त झाले आहेत. दिल्लीगेट भागातील एका टपरीवाल्याला वर्गणीची पावती दिली गेली ती पाहून त्या टपरीवाल्याचे डोळे पांढरे झाले होते. त्याच्या दुकानाचा महिन्याचा धंदा जेवढा होत नाही त्याच्या दुप्पट तिप्पट ही वर्गणीची पावती देऊन त्याला वर दम देण्याचाही प्रकार घडला आहे. तर बाजारपेठेतही काही व्यापाऱ्यांना अशाच प्रकारे दम देणे सुरू असून वर्गणी दिली नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रकार सध्या शहरात सुरू आहे.त्यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला असून याबाबत पोलिसांनी वेळीच दखल घ्यावी अन्यथा व्यापारांचा असंतोष कधीही बाहेर होऊ शकतो.
तर एका अत्यंत गरीब माणसाला एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने वर्गणीची पावती दिली ती पावती पाहून त्या माणसाला धक्का बसला होता. त्याच्या वर्षभराची कमाई नसेल एवढी रक्कम त्या वर्गणी पावतीवर लिहिली होती आणि आता वर्गणी देत नाही म्हणून त्याला दम देण्याचा प्रकार घडला असून याबाबत आता त्या माणसाने पोलीस पोलिसांकडे धाव घेतली आहे.