अहमदनगर दि.१९ जुलै
अहमदनगर जिल्ह्यात खून,दरोडे,मारामारी थेट पोलिसांवर गोळीबार आणि पोलिसांकडून महिलेवर अत्याचार असे विविध प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून वाढले आहेत. यामध्ये नगर शहरात दोन महिन्यात दोन खून भर चौकात भर वस्तीमध्ये झालेले आहेत. हे दोन्हीही खून वर्चस्वाच्या लढाईतून झाले असून त्याचप्रमाणे शेवगाव येथे दरोड्या मध्ये व्यापारी कुटुंबातील दोन जणांचा खून करण्यात आला होता. श्रीगोंदा येथे नुकताच उघडकीस आलेल्या एका कामगाराला फाशी देऊन ती आत्महत्या असल्याचं भासवलं गेलं होतं मात्र तोही अखेर खूनच निघाला. तर जामखेड येथे थेट पोलिसावरच बंदूक रोखून मारण्याचा प्रयत्न केला मात्र नशीब बलवत्तर म्हणून ती गोळी अडकली आणि तो अधिकारी वाचला. तर राहुरी येथे एका उपनिरीक्षकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. एकंदर पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारांनी चांगलंच डोकं वर काढले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी आपला दांडूका बाहेर काढणे गरजेचे आहे.
मुंबई,पुणे,नाशिक या ठिकाणी काही दिवसांपूर्वी कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. या कोयता गँगची नागरिकांमध्ये मोठी दहशत होती ती दहशत मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी थेट या कोयता गॅंग मधील गुन्हेगारांची धिंड काढली होती. जोपर्यंत नागरिकांच्या मनातून अशा गुंडांची भीती जात नाही तोपर्यंत असे गुंड सामान्य नागरिकांच्या छाताडावर बसून नाचणारच! त्यामुळे आता नगर पोलिसांनी नगर शहरात ज्याप्रमाणे धडाकेबाज दुचाकी चार चाकी वाहनांची तपासणी करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे गुंडांना सुद्धा पकडून त्यांची धिंड काढणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या खून प्रकरणातील सर्व आरोपी हे सर्व गुंड असून प्रत्येकावर अनेक गंभीर गुन्हे आहेत अशा गुंडांची धिंड काढून समाजामधील त्यांच्या प्रती असणारी भीती कमी करण्याची गरज आहे. जेणेकरून पुढील काळात कोणताही गुंड गुंडागिरी करणारा धाजवणार नाही. जर पोलिसांना कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवायचे असेल तर खडक पावणे उचलणे गरजेचे आहे अन्यथा हे गुंड सामान्य नागरिकांना बरोबरच पोलीस प्रशासनाच्या डोक्याचा ताप वाढू शकतात.
पोलिसांनी अंकुश चत्तर याच्या खून प्रकरणानंतर जे आरोपी पकडले आणि त्या आरोपींची पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी जेव्हा प्रसिद्ध केली तेव्हा अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही आरोपी अहमदनगर शहरात मोकाटच फिरत होते. अशा आरोपींना हद्दपार किंवा जिल्हा बंदी करणे गरजेचे आहे मात्र तसं न होता हे आरोपी सर्वसामान्य नागरिकांच्या छाताडावर बसून गुंडागिरी करत आपले बस्तान बसवत असतात.त्यामुळे आता पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तडीपार करणे गरजेचे आहे.