अहमदनगर दि.१२ डिसेंबर
दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक असलेले हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन महिन्यापूर्वी अहमदनगर शहरांमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हेरंब कुलकर्णी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध्य व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन तेथील अवैद्य टपऱ्या काढण्याची मागणी केली होती या कारणावरून हेरंब कुलकर्णी यांच्यावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेला दोन महिने होऊन गेले आहेत आणि नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे 32 आमदारांनी या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता तर आज याबाबत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.
मात्र या हल्ल्याच्या घटनेनंतरही अहमदनगर शहरातील परिस्थिती बदलली नसून शहरातील अवैद्य गुटखा विक्री आणि अवैध धंदे आहेत तसेच सुरू असल्याच हेरंब कुलकर्णी यांनी सांगितलय. प्रशासकीय स्तरावर सर्वच अधिकारी जबाबदारी एकमेकांवर ढकलत असून अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे ही फार चिंतेची बाब असून सध्याची नगर शहरातील परिस्थिती पाहता गुटखाबंदी ही फसलेली बंदी आहे असं वर्णन सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.
शहरातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात सुरू आहे. मात्र अन्न औषध प्रशासन याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असून या मावा आणि गुटखा विक्री करणाऱ्या या महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून लावण्यात येत असताना महानगरपालिका ही याकडे दुर्लक्ष करत आहे. तर तोफखाना पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गुटखा विक्री खुलेआम जोरात सुरू असून याकडेही दुर्लक्ष होत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात याच प्रकारे सर्व अवैद्य धंदे सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे हा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर माझ्यामागे सर्वजण ठामपणे उभा राहतील असे संपूर्ण प्रशासनाने सांगितले होते मात्र माझ्यावर प्रेम असले तरी तरुण पिढी वाचवण्यासाठी हे सर्व विनाशकारी अवैध धंदे बंद होणे गरजेचे आहे मात्र ते बंद होताना दिसत नाही असेही हेरंब कुलकर्णी यांनी सांगितलेय.