अहमदनगर दि.७ जानेवारी
हुक्का कल्चर हे आता मेट्रोसिटीतून थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे.हुक्क्याच्या एका कश ने काय होतय ! असं म्हणत शालेय विद्यार्थ्यांसह तरुण पिढी या हुक्याच्या व्यसनात हळूहळू नाशेबाज होत चालली आहे.हुक्का म्हणजे निव्वळ टाइमपास. त्यामुळे आरोग्याला धोका कुठला? असला युक्तिवाद हुक्क्याचे व्यसन लागलेले तरुण करतात.
हुक्क्यामुळे आरोग्यावरही वपिरित परिणाम होतात. त्याकडेही लक्ष देण्याची वेळ आली आहे. ‘हुक्का पार्लर’चे ‘फॅड’ जेव्हा नगर शहरात पोहोचले, तेव्हा ते केवळ श्रीमंतांपर्यंत मर्यादति होते. पण ते हळुहळू वाढत गेले. आता अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत मोठमोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा चोरीछुपे हुक्का पार्लरची सोय केली जाते.
हुक्क्याच्या या ‘कश’मध्ये गेल्या काही वर्षांत नाविन्य आले आहे. तंबाखू नाही, असा युक्तिवाद करायचा, तर त्याला वेगवेगळे रंग देण्यात आले. फळांचे, फुलांचे फ्लेव्हर असलेले, पण तंबाखूची नशा देणारे हुक्के तरुणांमध्ये प्रसिद्ध झाले. हुक्क्यावर बंदी आली तरीही हुक्का ज्या पेनमधून मिळतो, त्या पेन्सची चलतीही विद्यार्थ्यांमध्ये वाढली. अवघ्या शंभर दोनशे रुपयांपासून ते पाच दहा हजार रुपया पर्यंत हुक्का ई पेन सध्या तरुणांमध्ये आकर्षण ठरला आहे कुठे जायची गरज नाही छापा पाडायची भीती नाही सहजरीत्या खिशामध्ये बाळगता येणारा हा पेन कुठेही चार चौघात बसून हळूच हुक्का ओढू शकतो एवढी सोय आता झालेली आहे. तासाच्या हिशेबाने तीनशे ते पाचशे रुपयांना मिळणारा हुक्क्यांचा ‘कश’ स्वस्त वाटू लागला. कुठे जागा मिळाली नाही, तर मोकळे मैदान, अडोशाच्या जागा रूमवर राहणाऱ्या मित्रांच्या घरीही हुक्का पार्ट्यांसाठी जागा ठरू लागली.
‘हुक्का व्यसन नाही’ हा गैरसमज महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह कर्करोग तज्ज्ञांनीही मोडून काढलाय..टाटा कॅन्सर रुग्णालयाचे डॉ. पकंज चतुर्वेदी हुक्क्याच्या गंभीर परिणामाबद्दल वारंवार सांगितले आहे. हुक्क्याचा एक ‘कश’ शंभर सिगारेट इतके नुकसान करतो. हुक्क्याचे पॅसिव्ह स्पोकिंगही ततिकेच धोकादायक असते. हुक्क्यामध्ये असलेल्या कोळशामुळे कार्बन मोनोऑक्साइडसह अनेक घातक वायू तयार होतात, त्याचाही आरोग्यावर दुष्परिणाम होतो. ग्रामीण आणि शहरी भागातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये हुक्कासेवनाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. ३५ ते ४० मिनिटे हुक्का ओढल्याने शरिरातील निकोटिनचे प्रमाण दोनशे टक्क्यांहून वाढते, याकडेही कर्करोग तज्ज्ञ लक्ष वेधतात.कर्करोगाचा विळखा जितका तंबाखू, सिगारेटमुळे आवळत जातो, तितकाच तो हुक्क्यांमुळेही आवळू शकतो, हे तरुणांनी वेळीच लक्षात घेण्याची गरज डॉ. चतुर्वेदी व्यक्त करतात.
त्यामुळे नुसता हुक्का पार्लर नाही तर आता पान टपऱ्यांवर विकण्यासाठी येणाऱ्या वेब ई हुक्का पेन वर सुद्धा कारवाई करणे गरजेचे आहे. जवळपास एका ई सिगरेट वेब हुक्का पेन मध्ये पाच हजार कश एक माणूस ओढू शकतो. आणि विशेष म्हणजे याला मोबाईल सारखे चार्जिंग करण्याची सोय असल्यामुळे व अत्यंत छोटा असल्यामुळे सहजरीत्या कुणीही हा वेब हुक्का पेन खिशामध्ये ठेऊ शकतो. त्यामुळे आता पालकांसमोर हुक्का पार्लर बरोबरच आता या वेब पेनची भीती आली आहे आपला मुलगा या व्यसनाच्या आहारी गेला नाही ना याकडे लक्ष देण्याची गरज पालकांना आहे.
नगर शहरातील चोरी छुपे चालणारी सर्व हुक्का पार्लर्सवर बंदी करण्याची गरज आहे.या बाबत कर्करोग तज्ज्ञांनी याला दुजोरा दिला आहे. हुक्क्याचे व्यसन १८ ते २४ या वयोगटात मोठ्या प्रमाणात वाढते आहे. यामध्ये तरुणांइतकेच तरुणींचेही प्रमाण आहे. यासंदर्भातील सर्व आकडेवारी, रुग्णांचे हाल सरकारपुढे खुद्द कर्करोगग्रस्त रुग्णांनीच ‘से नो टु टोबॅको’सारख्या आरोग्यचळवळीमधून मांडले आहेत.मात्र सरकार पोलीस प्रशासन हुक्का पार्लर्सच्या बंदीसंदर्भात, कठोर भूमिका घेऊ शकते का, हाच प्रश्न आहे. कारण गुटखा बंदी नंतरही महाराष्ट्रामध्ये गुटखा खुले आम् विक्री केला जात आहे. तर या धंद्यात व्हाईट कॉलर असणारे लोकच मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असल्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर बंदी येऊ शकते का हा मोठा प्रश्न आहे.
अहमदनगर शहरात अनेक सामाजिक संस्था आहेत या सामाजिक संस्थांमुळे अनेक चांगले कामही नगर शहरात सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या सामाजिक संस्था थंड पडल्या आहेत कुणीही तंबाखू विरोधी चळवळीत सहभागी होताना दिसत नाही. थेट अहमदनगर शहरात दारूबंदी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला होऊनही फक्त दोन दिवस याबाबत चर्चा झाली आणि पुन्हा मागचे पाढे 55 या म्हणीप्रमाणे नगर शहरात सर्व अवैध धंदे सुरू झालेत त्यामुळे सामाजिक संस्था फक्त मिरवण्यासाठीच आहेत का ? असा सवाल आता उपस्थित होतेय.