अहमदनगर दि.३१ ऑक्टोबर
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलन उपोषण आणि मोर्चाद्वारे सरकारला जाग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता सरकार दरबारी या प्रश्नावर गांभीर्याने विचार विनिमय सुरू असून लवकरच या प्रश्नावर काही तोडगा निघेल अशी अपेक्षा मराठा समाजाला असून मराठा समाजाने आता हिंसक आंदोलन न करता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार आमरण उपोषण आणि साखळी उपोषण करावे आणि सरकारला तसेच मनोज दरांगे पाटील यांना सहकार्य करावे असे आवाहन अहमदनगर येथे आमरण उपोषणाला बसलेले गोरख दळवी, अमोल हुंबे,नवनाथ काळे संतोष अजबे यांनी समस्त मराठा समाजाला केले आहे.
हिंसक आंदोलन केल्यानंतर मराठा बंधावांवर गुन्हे दाखल होऊन तेच कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे शांततेच्या संयमाच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आरक्षण मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे हा लढा अंतिम दिशेला जात असून लवकरच आपल्याला काहीतरी चांगला निर्णय सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यात हे आंदोलन आले असताना सर्व मराठा समाजाने शांतता संयमाने आंदोलन करावे असेही आवाहन आमरण उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहे.