अहिल्यानगर : सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुराण याची पाने फाडून त्याचा व्हिडिओ तयार करून, त्यावर आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकत धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात साहेबान अन्सार जहागीरदार (वय ३५, रा. बेलदार गल्ली, सर्जेपुरा रोड, नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

३ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या मोबाईलवर इंस्टाग्रामवरील व्हिडिओ आणि रील्स पाहत असताना “गुरु १००” या आयडीधारकाने मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुराण याची पाने फाडतानाचा व्हिडिओ तयार करून, त्यावर अश्लील व आक्षेपार्ह टिपणी करत तो आपल्या आयडीवरून पोस्ट केल्याचे निदर्शनास आले. या कृत्यामुळे फिर्यादी तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे फिर्यादी जहागीरदार यांनी तत्काळ तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार च दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून “गुरु १००” या इंस्टाग्राम आयडीधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.





