अहमदनगर दि.१९ ऑगस्ट
अहमदनगर शहरात ताबेमारी थांबता थांबेना ही ताबेमारी आता नगर शहरातील प्रत्येक भागात सुरू झाली असून उपनगरांमधील मोकळ्या जागेंना आता प्रचंड भाव मिळत असल्याने ही ताबेमारी सध्या जोरात सुरू आहे. नगर शहरातील सावेडी पासून ते केडगाव पर्यंत भिंगार पासून ते बुरूडगाव रोड पर्यंत विविध ठिकाणी ताबे मारण्याचे प्रकार सुरूच आहेत.
केडगाव मध्ये पुन्हा एकदा गुंडागिरी सुरू
केडगाव येथील परिसरामध्ये असणाऱ्या सर्व्हे नंबर ३६७/१+४३९/१ मधील तीन ते चार प्लॉटवर काही लोकांनी बळजबरी ताबा मारण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रार अर्ज प्लॉट धारकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिला आहे.
अहमदनगर शहरातील बुरुडगावरोड, चीपडे मळा, सारसनगर या ठिकाणी राहणाऱ्या काही मध्यमवर्गीय लोकांनी केडगाव येथे आपले हक्काचे घर होईल असे स्वप्न पाहून प्लॉट घेतले होते. प्लॉटची रीतसर खरेदी झाल्यानंतर मूळ प्लॉट धारकांनी संपूर्ण प्लॉट मोजून मापून नवीन मालकांच्या ताब्यात दिले होते. आपले स्वतःचे हक्काचे घर होणार हे स्वप्न पाहत असतानाच या स्वप्नावर आघात करण्याचे काम काही लोकांनी केले.
सहा जून रोजी एका अनोळखी मोबाईल नंबर वरून केडगाव मध्ये प्लॉट घेतलेल्या लोकांना फोन आला आणि त्यांना प्लॉटवर बोलवून घेण्यात आले. आणि हा प्लॉट तुम्ही विकत घेतले आहेत का? अशी विचारणा केली प्लॉट मोजून घेतले असल्याची खात्री या अज्ञात लोकांनी केली मात्र प्लॉट धारकांना याबाबत अनेक प्रश्न पडले होते मात्र एकाही प्रश्नाचे उत्तर न देता ते दहा-बारा लोक तिथून चार चाकी गाडीतून निघून गेले आणि त्यानंतर सहा दिवसानंतर 10 जून रोजी पुन्हा दहा ते बारा लोकांनी प्लॉट वर येऊन प्लॉट धारकांनी केलेले तारेचे कंपाउंड उघडून टाकले.
ही घटना प्लॉट धारकांना कळतात सर्व प्लॉट धारक धावत पळत केडगाव येथे गेले व त्या ठिकाणी असलेल्या जोशी नामक व्यक्तीला प्लॉट धारकांनी संपूर्ण खरेदीखत आणि मोजणी दाखवून तुमच्या प्लॉटचा आणि आमच्या प्लॉटचा काहीही संबंध नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला दोन वेगवेगळे गट असताना तुम्ही आमचे कंपाउंड का पाडले अशी विचारणा करूनही जोशी नामक व्यक्तीने त्या प्लॉट धारकांना सांगितले की “मी सदरच्या प्लॉटची विक्री केलेली असून त्याचे टोकन स्विकारलेले आहे तुम्ही मला काही सांगू नका तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे म्हणत दहा ते बारा जणांचे टोळके घेऊन तो जोशी नामक व्यक्ती चार चाकी गाडी मधून निघून गेला.
या घटनेनंतर त्या प्लॉट धारकांच्या पायाखालची जमीनच घसरली कष्ट करून थेंबा थेंबाने साठवलेल्या पैशातून पुढील पिढीचे स्वप्न साकार करण्यासाठी घेतलेल्या प्लॉटवर असा अचानक ताबा मारून प्लॉट तुमचा नाहीच तो विक्री केलेला आहे असे शब्द कानावर पडल्याने अनेकांना मोठा धक्का बसला होता. अचानक ताब्याचे डोक्यावर आभाळ कोसळल्या मुळे प्लॉट धारक हवालदिल झाले आहेत.अखेर प्लॉट धारकांनी पोलिसांकडे धाव घेतली असून अनिल जोशी,मच्छिंद्र जगताप
व इतर अनोळखी १०-१२ इसम यांनी बेकायदेशीररित्या कायदा हातात घेवून आमच्या खरेदी मालकीच्या प्लॉटचे तारेचे कंपाऊंड नष्ट करुन आमचे मोठेनुकसान केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द तक्रार असल्याचा अर्ज पोलिसांकडे देण्यात आला आहे.
याच प्रकारे केडगाव मध्ये अजूनही काही ठिकाणी छोट्या प्लॉट धारकांच्या लेआउट वर थेट नांगर फिरवून प्लॉट धारकांच्या सर्व खुणा नष्ट केल्याचे प्रकारही झाले असून याबाबत मात्र भीतीपोटी कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेले नाही तर काही प्लॉट धारकांना आम्हाला कमी किमतीत प्लॉट विका अन्यथा ठराविक रक्कम आम्हाला प्लॉट डेव्हलपिंग चार्जेस म्हणून द्यावे लागेल असेही फर्मान काढण्यात आल्याची माहिती असून यामुळे पुन्हा एकदा ताब्याचे प्रकार सुरू झालेत का काय असा प्रश्न समोर आला आहे.
या प्लॉट धारकांच्या ताबे मारण्याच्या मागे असलेल्या लोकांच्या मागे केडगाव मधील काही राजकीय लोकांचा वरदहस्त असल्याचं बोललं जातं कारण अनेकांच्या सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोवर राजकीय नेत्यांचे बरोबर असल्याचे छायाचित्र पाहायला मिळालेले आहे त्यामुळे काही लोकांच्या आडून पुन्हा केडगाव मध्ये दहशतीचे वातावरण सुरू करण्याचा प्रयत्न तर नाही ना असा सवाल उपस्थित राहतोय.
प्लॉट धारकांच्या प्लॉटवर नांगर फिरवणे अथवा डेवलपिंग चार्जेस ची रक्कम मागणी म्हणजे हा एक दहशतीचा प्रकार असून सर्वसामान्य माणसाला धडकी भरण्याचा हा प्रकार आहे. जन्मभर कष्ट करून जमवलेली पुंजी अशी एका क्षणात जात असेल तर त्या कुटुंबावर किती मोठा आघात होत असेल त्यामुळे या झुंडशाही विरुद्ध एकत्र येऊन लढले तरच ही झुंड शाही मोडीत निघेल त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस प्रशासनाशी संपर्क करून वेळीच झुंडशाही मोडून काढण्याची गरज आहे.
केडगाव मधील त्या प्लॉट धारकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली असली तरी हे प्रकरण प्लॉटच्या जमिनीचे असल्यामुळे आता चौकशी सुरु असून संपूर्ण गटाची मोजणी करून त्यानंतर पुढे ठरवू असा सल्ला देण्यात आल्यामुळे प्लॉट धारक अजूनही अधांतरीच आहेत