अहमदनगर दि.१२
दुचाकी वाहने अस्ताव्यस्त, ट्रिपल सीट आणि विना परवाना चालवून तसेच विद्यार्थिनींना कट मारून त्यांची छेडछाड काढणाऱ्या काही टुकार तरुणांविरोधात कोतवाली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात काही अल्पवयीन मुले विना परवाना वाहने चालवून स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतात अशा असंख्य तरुणांना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चांगलाच धडा शिकवला आहे.अशा बेशिस्त टुकार तरुणांना त्यांच्या दुचाकीसह पोलीस ठाण्यात हजर केल्याने अनेकांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे.
शहरातून मोकाट आणि वेगात वाहने चालवून नागरिकांना त्रास देणे, अल्पवयीन शाळकरी मुलींना दुचाकीने कट मारणे, छेडछाड करणे, विना परवाना दुचाकी चालवणे,परवाना नसताना ट्रिपलशीट गाडी चालवून अपघातासारखी परिस्थिती निर्माण करणे अशा अनेक घटना पोलिसांच्या निदर्शनास येत होत्या.याबाबत तशा तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अनेकउपाय योजना केल्या आहेत.टुकार तरुणांचा सुरू असलेला धांगडधिंगा मोडून काढण्यासाठी आज कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत नगर कॉलेज केडगाव,कापड बाजार, माळीवाडा बस स्थानक परिसर व इतर परिसरात एकूण पाच टीम तयार करून कारवाई करण्यात आली. एकूण ३२ वाहने पोलीस ठाण्यात आणून ३५,००० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. सर्व तरुण थेट पोलीस ठाण्यात उभे करून त्यांच्या आई वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. अल्पवयीन मुलांकडे वाहने देऊ नयेत. त्यांना वाहने चालवण्याचा परवाना नसल्याने अपघात होतात. या अपघातात अपंगत्व आले तर मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.त्यामुळे पालकांनीही याबाबत जागरूक राहायला हवे असे आवाहन चंद्रशेखर यादव यांनी केले.
याअगोदरही बेधडकपणे दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गाड्या पोलीस ठाण्यात जमा करून व त्यानंतर नातेवाईकांना बोलावून टूकारांना तंबी देण्याचे काम कोतवाली पोलीस करत आहेत. रात्रीपर्यंत कारवाई सुरू होती. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास थोरात शिवाजी मोरे सतीश शिंदे महेश बोरुडे सागर मिसाळ सतीश भांड सोमनाथ राऊत रोहित ठोंबे गुलाब शेख अशोक कांबळे श्रीकांत खताडे सागर दुशिंगे अंकुश कासार योगेश भिंगारदिवे संतोष बनकर संतोष जरे अमोल गाडे सुजय हिवाळे याकूब सय्यद रिंकू काजळे अर्जुन फंदे महिला पोलीस जवान शिल्पा कांबळे हिनाबी शेख सुशीला ढोकणे यांनी कारवाई केली.