अहमदनगर दि.४ मे
जीवन प्राधिकारणामार्फत राबविण्यात आलेल्या पाणी योजनेच्या लोकार्पणासाठी लावण्यात आलेली कोनशिला फोडून पोलीस कर्मचाऱ्यास जखमी केल्याप्रकरणी सन २००७ मध्ये दाखल झालेल्या गुन्हयाप्रकरणी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची नगर येथील सत्र न्यायाधीश एम.आर.नातू यांनी निर्दोष मुक्तता केली. १८ ऑगस्ट २००७ रोजी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप पंढरीनाथ जमदाडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात नीलेश ज्ञानदेव लंके, लाला साठे तसेच इतर वीस जणांविरोधात जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेच्या लोकार्पणाची कोनशिला दगडफेक करून तोडफोड, पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण केली, शासकिय कामात अडथळा आणला तसेच दगड मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सन २००४ च्या विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणूकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार स्व. वसंतराव झावरे यांचा पराभव करून शिवसेनेचे विजय औटी हे आमदार झाले होते. तत्कालीन आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या कार्यकाळात पारनेर शहरातील ग्रामिण रूग्णालय तसेच पारनेर शहरास पाणी पुरवठा करणा-या पाणी योजनेस मंजुरी मिळून ती कामे सुरू झाली होती. त्यानंतरच्या निवडणूकीत मात्र स्व. वसंतराव झावरे यांचा पराभव झाला. त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असल्याने १८ ऑगस्ट २००७ मध्ये रोजी स्व. वसंतराव झावरे यांच्या पुढाकारातून ग्रामीण रूग्णालय व पाणी योजनेच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे दोन्ही कामाचे लोकार्पण करणार होते. या संपूर्ण कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँंग्रसचीच छाप होती.
दोन्ही कामांचे लोकार्पण करताना स्थानिक आमदार म्हणून शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना विश्वासात घेण्यात आले नाही. स्थानिक आमदाराचा तो हक्क असल्याने त्याविरोधात तत्कालीन आमदार विजय औटी यांनी पारनेर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. एकीकडे विजय औटी यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नीलेश लंके, लाला साठे व इतर २० जणांनी हंगा शिवारातील जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजनेच्या टाकीकडे कुच करून कोनशिलेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पो. कॉ. जमदाडे व पो ना इधाटे यांनी असे करू नका हे बेकायदेशीर आहे असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता जमावाने दगडफेक करीत कोनशिला फोडून टाकली. दगडफेकीत प्रकाश जमदाडे हे जखमी झाले होते.
जय भवानी, जय शिवाजी
शिवसेनेपासून राजकारणाला सुरूवात केलेल्या नीलेश लंके यांनी विजय औटी यांचे उपोषण सुरू असतानाच सहा असानी रिक्षा तसेच काही मोटारसायकल घेत जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी साठवण टाकीकडे कुच केली. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत कोनशिला फोडून टाकण्यात आली होती.
औटींचे उपोषण आणि तणाव
विजय औटी यांना विश्वासात न घेतल्याने पारनेर शहरात तणावाचे वातावरण होते. तत्कालीन पालकमंत्री यांचा रस्ता आडविण्यासाठी रस्त्यावर बैलगाडया, जनावरे बांधण्यात आले होते. तणाव निर्माण झाल्याने प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला होता. अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी करीत या प्रकरणात तोडगा काढला.
औटी यांना सन्मान आणि लोकार्पण
औटी यांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने विजय औटी यांना सन्मानाने कार्यक्रमास पाचारण करून पालकमंत्री दिलीप वळसे, तत्कालीन आरोग्य मंत्री, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले होते.
लंके-औटींचे मनोमिलन आणि गुन्हयाचा निकाल
बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आ. नीलेश लंके व मा. आ. विजय औटी यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत ही निवडणूक एकत्रीत लढवून सर्व १८ जागा खिशात घातल्या. गुरू-शिष्याचे मनोमिलन झाल्यानंतर गुरूच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःवर गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर या भावनेतून भूमिका घेणाऱ्या आ. नीलेश लंके यांची गुरू-शिष्याच्या मनोमिलनानंतर गुन्हयातून निर्दोष मुक्तता झाली हा योगायोग आहे.
गुन्हा सिध्द झाला नाही
न्यायाधीश एम आर नातू यांनी या गुन्हयाच्या सुनावणीदरम्यान गुन्हा सिध्द झाला नाही, साक्षीदारांच्या जबाबामधील तफावत लक्षात घेता पुरेशा पुराव्यांअभावी आ. नीलेश लंके व इतरांची निर्दोष मुक्तता केली. आ. लंके यांच्या वतीने अॅड. सतीश गुगळे, अॅड. युवराज पाटील, अॅड. राहुल झावरे, अॅड. स्नेहा झावरे, अॅड. गणेश दरेकर, अॅड. शिवदास शिर्के यांनी काम पाहिले.