अहमदनगर दि.२ ऑक्टोबर
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. राज्यातील१३ जिल्हात होणाऱ्या या दौऱ्याची सुरूवात जालन्यातील अंतरवली सराटी गावातून सुरू केलीय . या दौऱ्याचा पहिला थांबा हा परभणीच्या जिंतूर होता.मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यासोबतच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. यानंतर मराठवाड्याबाहेर सोलापूर, नगर, नाशिक, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात देखील मनोज जरांगे दौरा करणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात सहा आणि सात ऑक्टोबर रोजी त्यांचा दौरा प्रस्तावित असून यासाठी सध्या अहमदनगर जिल्ह्यात युद्ध पातळीवर नियोजन बैठका सुरू आहेत अहमदनगर शहरात मनोज जरांगे यांची सभा होणार असून या सभेच्या नियोजनासाठी अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला अहमदनगर शहरातील आणि शहराच्या आजूबाजूतील परिसरातील मराठा समाजाच्या बांधवांनी उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांच्या वेळेमधील ३० दिवस १४ ऑक्टोबर रोजी संपणार आहेत. यापूर्वी जरांगे यांनी जाहिर केल्याप्रमाणे मनोज जरांगे १४ तारखेला मराठा समाजाची जाहीर सभा घेणार आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांचा हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे.