अहमदनगर दि. 2 सप्टेंबर
जालना तालुक्यातील अंतरवाली सराटा हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर प्रसिद्धीमध्ये आले आहे. कारण या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते मात्र शुक्रवारी या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि संपूर्ण महाराष्ट्र यामुळे संतप्त झाला आणि विविध ठिकाणी या लाठीचार्जचे पडसाद उमटले आहेत.
मात्र या आंदोलन यांनी सुरू केले ते मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील मतोरी गावचे मात्र काही दिवसांपासून ते अंबड मध्ये स्थायिक झाले असून त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले.मनोज जरांगे यांनी आजपर्यंत तीस पेक्षा जास्त आंदोलनामध्ये सहभाग घेऊन अनेक वेळा आमरण उपोषण, आंदोलन आणि सत्याग्रह केलेले आहेत. या आंदोलनासाठी त्यांनी स्वतःची दोन एकर जमीन विकल्यचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना झाली होती त्यानंतर या अत्याचारातील आरोपींवर शिवबा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता या हल्ल्यामधील कार्यकर्ते हे मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते होते असंही बोलले जाते कारण त्यांना न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांनी मोठे प्रयत्न केले होते.
अवघ्या बारावी पर्यंत शिक्षण असणाऱ्या मनोज जरांगे यांनी मात्र विविध समाजातील लोकांसाठी अनेक वेळा मोठमोठ्या केसेस अंगावर घेतल्या आहेत. केवळ मराठा समाजासाठी नव्हेच तर इतर समाजासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलना केली आहेत मात्र शुक्रवारी झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मनोज जरांगे हे महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचले आहेत.
पोलिसांनी केलेल्या लाठी हल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहेत. मात्र हिंसक आंदोलन न करता आपल्याला शांततेच्या मार्गाने जायचं आहे. त्यामुळे जो हिंसक आंदोलन करेल तो आमचा नाही असे स्पष्टपणे मनोज जारांगे यांनी सांगितले आहे.