अहिल्यानगर : केडगाव उपनगरातील मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर महापालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सभापती मनोज कोतकर यांच्या माध्यमातून महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा केला जात होता. पाणीप्रश्न न सुटल्यामुळे शुक्रवार दि. 12 डिसेंबर रोजी महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर हंडा मोर्चा व मटका फोडो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीची बैठक आयोजित केली होती. यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंता परिमल निकम यांनी स्पष्ट केले की सध्या केडगाव उपनगराला 75 लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. आता हा पाणीपुरवठा वाढवून दररोज चार तासांनी अधिक पाणी दिले जाणार असून, यामध्ये बारा लाख लिटर वाढीव पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या सकारात्मक निर्णयामुळे प्रस्तावित आंदोलनाला मोठे यश मिळाले असून उद्याचा हंडा मोर्चा अधिकृतरीत्या स्थगित करण्यात आल्याची माहिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली.

अहिल्यानगर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागात झालेल्या या बैठकीत जल अभियंता परिमल निकम प्रमुख उपस्थित होते. यावेळी माजी सभापती मनोज कोतकर, इंजिनिअर महादेव काकडे, तसेच केडगावचे वॉल मॅन स्टाफ उपस्थित होते.यावेळी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.