अहिल्यानगर दिनांक 16 फेब्रुवारी
शहरातील विळद बायपास जवळील वडगाव गुप्ता शिवार परिसरात एका ७५ वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली होती . या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करत अवघ्या चोवीस तासांच्या आत आरोपी शोधून त्यास जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बापू नामदेव शिंदे (वय ७५, रा. नवनागापूर, अहिल्यानगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा मोहन बापू शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.बापू शिंदे यांचा मृतदेह विळद बायपास जवळील साईबन समोरील एका मोकळ्या पटांगणात आढळून आला होता. अज्ञात आरोपीने कोणत्याही कारणावरून बापू शिंदे यांच्या डोयावर बोथट किंवा तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखम करून त्यांचा जीव घेतला.ही घटना १३ फेब्रुवारीच्या दुपार ते १४ फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि चौधरी आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
त्या नुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेज संकलित करुन त्याचे बारकाईने विश्लेषण केले आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या खून प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे त्याच्या पालकासमक्ष सी.सी.टी.व्ही. पुराव्याच्या आधारे सखोल चौकशी करण्यात आली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक बी. चौधरी, पोसई विनोद परदेशी, पोसई मनोज मोंढे, पोसई, विकास जाधव, सफौ. राकेश खेडकर, पोहेकॉ राजु सुद्रीक, पोहेकॉ संदीप पवार, पोहेकॉ सचिन आडबल, पोकों नवनाथ दहिफळे, पोकॉ राजेश राठोड, पोकॉ ज्ञानेश्वर आघाव, पोकॉ सुरज देशमुख, पोकॉ सचिन हरदास, पोकॉ उमेश शेरकर, पोकॉ राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.