अहमदनगर दि.५ जुलै
सावेडी उपनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या लक्ष्मी देवी मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या एका छोट्या ओढ्याला बुजवण्याचा कारनामा समोर आला आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या जेसीबीच्या साह्याने हा ओढा बुजवण्यात आला आहेअसा आरोप होतोय. त्यामुळे आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या देवी मंदिराच्या परिसरात घाणीचे साम्राज्य साचण्याची शक्यता असून हा छोटा ओढा कोणाच्या आदेशाने बुजवला गेला याबाबत अद्याप कोणतेही माहिती उपलब्ध नाही.
नगर शहरात ओढे नाले बुजून त्यावर घरे बांधण्याचे प्रकार या आधी समोर आले आहेत पावसाळ्यात या ओढे नाले बुजवल्यामुळे अनेक लोकांच्या घरात दरवर्षी पाणी घुसत असते मात्र तरीही महानगरपालिका ओढे नाले बुजवणाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत शिवसेनेचे नेते काका शेळके यांनी हा बुजवलेला छोटा ओढा त्वरित पूर्वीप्रमाणे पुढील ओढ्यामध्ये सोडण्यात यावा अशी मागणी केली असून पावसाळ्यात देवी मंदिराच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होईल हे महानगरपालिकेला चालेल का? असा सवालही त्यांनी केला आहे. सावेडी महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर भर रोडवर हा ओढा बुजवण्याचा प्रकार झाला असतानाही सावेडी विभाग डोळे झाकून गप्प का कोणाच्या आदेशाने हा ओढा बुजवला याची चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही काका शेळके यांनी केली आहे.
याप्रमाणेच तारकपूर भागातील इंदिरानगर परिसरात एका नाल्यावर थेट पक्के बांधकाम करून घर बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मात्र या प्रकाराकडेही महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असून पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी गेल्यावर महानगरपालिकेचे डोळे उघडणार का असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत