मंगळुरू दि.२० नोव्हेंबर
कर्नाटकातील मंगळुरू येथे एका ऑटो रिक्षात झालेल्या स्फोटाप्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. हा स्फोट सामान्य नसून मोठी हानी करण्याच्या उद्देशाने दहशतवादी घटना असल्याचे पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे. या स्फोटात ऑटोमध्ये बसलेला प्रवासी शारिक हा या संपूर्ण घटनेचा मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे. जो या स्फोटात 40 टक्के भाजला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनआयएचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून मंगळुरू पोलिसांसह माहिती घेत आहेत.
या प्रकरणाची माहिती देताना एडीजीपी म्हणाले की, कर्नाटकमध्ये दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यांनी संशयित दहशतवादी शारिकला मदत केल्याचा आरोप आहे. ऑटोमध्ये चढल्यानंतर त्याने चालकाला फक्त पंपवेल भागात जायचे असल्याचे सांगितले आणि ऑटोचालकाला काहीही सांगितले नसल्याचे दिसून येते. त्याने अन्यत्र स्फोट घडवण्याची योजना आखली होती.
पण चुकून नागोरीत स्फोट झाला. आम्ही 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आणि त्यांचे एकमेकांशी काय संबंध होते त्याची तपासणी चालू आहे.
दुसरीकडे, रविवारी एफएसएल टीमला म्हैसूरमधील शारिकच्या भाड्याच्या घरातून स्फोटक बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तू सापडल्या. जिलेटिन पावडर, सर्किट बोर्ड, लहान बोल्ट,बॅटरी, मोबाईल, वुड पॉवर, अॅल्युमिनियम मल्टी मीटर, वायर, मिक्सर जार, प्रेशर कुकर यांचा समावेश आहे. याशिवाय पोलिसांना एक मोबाईल आणि दोन बनावट आधार कार्ड मिळाले आहेत.