अहिल्यानगर दिनांक १७ जून
शासनाच्या 15 व्या वित्त आयोगाकडून महापालिका आरोग्य विभागासाठी प्राप्त झालेला 16 लाख 50 हजारांचा निधी अधिकाराचा वापर करून संगनमताने स्वतःच्या खात्यावर वर्ग करून अपहार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी शहर लेखा व्यवस्थापकावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात दोघांनाही अटक करण्यात आली होती.
महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल अशोक बोरगे, शहर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे यांना त्यावेळी अटक ही करण्यात आली होती.पुढे काही दिवसांनी डॉ.बोरगे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
या गुन्ह्याची सखोल चौकशी केल्यावर पोलिसांना या गुन्ह्यात डॉ. बोरगे यांचा सहभाग आढळून आला नाही, त्यामुळे कोतवाली पोलिसांनी तसा अहवाल शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक अमोल भारती यांना पाठविला. या अहवालावरून पोलिस उपअधीक्षक भारती यांनी या गुन्ह्यात डॉ. बोरगे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावाच नाही असे पत्र न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे डॉ. बोरगे यांना बीएनएसएस १८९ प्रमाणे गुन्ह्यातून वगळण्यात आले होते.
या प्रकरणात आता अहिल्यानगर न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला असून अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी एडवोकेट अभिजित पुप्पाल यांच्यामार्फत या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी आज आठवे सहदिवाणी न्यायाधीश पाटील यांच्या समोर होऊन या प्रकरणातील डॉक्टर अनिल बोरगे यांचा पोलिसांनी दिलेला १८९ चा रिपोर्ट अमान्य करण्यात आला आहे. त्यांच्या विरुद्ध प्रोसेस इश्युचा आदेश पारीत केला असून पुढील तारखेस हजर राहण्याबाबत त्यांना समन्स काढण्यात आले आहे. यामुळे डॉक्टर अनिल बोरगे यांच्या अडचणीत अजून भर पडली आहे . मध्यंतरी त्यांनी एक पत्र काढून महानगरपालिकेत आपल्याला पुन्हा रुजू करावे अशी मागणी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली होती.