नेवासा (प्रतिनिधी) – हिंदी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर होंडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्री ताई काटीकर पाटील यांनी होंडे यांना या नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले आहे.
होंडे यांना दिलेल्या पत्रात श्रीमती काटिकर पाटील यांनी, होंडे यांनी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचे प्रश्न शासन दरबारी वेळोवेळी मांडून त्यांचे निराकरण करण्याबरोबरच जनसामान्यांत जागृती निर्माण करण्यासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सुधाकर होंडे हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी दैनिक लोकविर टाइम्स तसेच सुधा न्यूज वृत्तपत्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठा झंझावात निर्माण करत दिशादर्शक काम केले आहे. या माध्यमातून त्यांचा जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असून आगामी काळात हिंदी मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून तालुकास्तरिय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार असल्याचे होंडे यांनी स्पष्ट केले आहे.
या नियुक्तीबद्दल होंडे यांचे जिल्हाभरातील विविध मान्यवरांसह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधवांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.