मुंबई ६ फेब्रुवारी :
आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले.
एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील ६१८ एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता. उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे.
या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग १ करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला.
सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.