अहिल्यानगर – शहराला अधिक आधुनिक, स्वच्छ आणि आकर्षक बनवण्यासाठी महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम आणि सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून, त्याला आता गती मिळत आहे. शहरातील प्रमुख कॉंक्रिट रस्ते पूर्ण होताच त्या रस्त्यांवरील दुभाजकांची रंगरंगोटी करण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे शहराचा एकूणच चेहरामोहरा बदलत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत दररोज रस्त्यांवरील कचरा, झाडांच्या फांद्या, दुभाजक जवळील माती, फुटपाथवरील गवत यांची सफाई सातत्याने करण्यात येत असून, त्याचबरोबर शहरातील मुख्य मार्गांवर दुभाजकांची साफसफाई आणि रंगकाम चालू आहे. यामुळे शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर स्वच्छ, देखणा आणि नीटनेटका पायाभूत बदल दिसून येत आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारमार्फत सुरू असलेल्या रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामांना वेग आला आहे. अनेक रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण पूर्ण होताच त्या रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण आणि रंगरंगोटीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. यामुळे प्रवासी नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित रस्त्यांचा वापर करता येत आहे.
महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अहिल्यानगर शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने आपला घरगुती कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा. नव्याने रंगवलेल्या दुभाजकांवर गुटखा पिचकारी मारणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शहर विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना नागरिकांनीही समज देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, हिरवाई वाढवणे, रस्त्यांवरील प्रकाश योजना सुधारणा आणि स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्याची कामेही सुरू आहेत. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या कामांमुळे अहिल्यानगरचा विकास आणि सौंदर्यीकरण दोन्ही ही अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमांमुळे शहराच्या स्वच्छतेत आणि देखाव्यात मोठी सुधारणा दिसून येत असून, नागरिकांनीही सहकार्य केल्यास अहिल्यानगर हे स्वच्छ, नीटनेटके आणि आदर्श शहर बनण्याची शक्यता अधिक बळकट होत आहे.