अहमदनगर – दि.२८ सप्टेंबर -स्वच्छता ही सेवा अभियानात शनिवारी सकाळी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार परिसरात व नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवी मंदिर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने नागरीक, व्यावसायिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आढळून आला. यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आवाहन केले. तसेच, व्यावसायिकांच्या स्वच्छतेविषयक अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजनांचे आदेश दिले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. शनिवारी दहाव्या दिवशी अभियानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा संकलित करण्यात आला. बाजारपेठेत झालेल्या मोहिमेत रेसिडेनशियल हायस्कूल व मार्कंडेय विद्यालयाचे विद्यार्थी, मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन, विद्युत विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर केडगाव येथे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाग्योदय विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांसमवेत मोहिमेत सहभागी होऊन परिसरातील कचरा साफ केला.
स्वच्छतेसाठी महानगरपालिका सातत्याने उपाययोजना करत आहे. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. अनेक नागरिक, संघटना अभियानाला प्रतिसाद देऊन त्यात सहभागी होत आहेत. यापूर्वी प्रशासन व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे माझी वसुंधरा अभियानात नगर महानगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षी सहा कोटी रुपयांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. शहर सौंदर्यीकरण, कचरा मुक्त शहरासाठीही उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांनीही स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी, रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
स्वच्छता मोहिमेअंतर्गत रविवारी ऐतिहासिक वास्तू संग्रहालय, स्टेट बँक चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यात महिला बचत गट, जगदंबा विद्यालयाचे विद्यार्थी, मनपाच्या झेंडीगेट कार्यालयाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.