अहमदनगर दिनांक 15 सप्टेंबर
अहमदनगर शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि अहमदनगर शहरातील सर्वच नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होऊन शिवसेनेमधून फुटून 40 आमदारांसह एकनाथ शिंदे बाहेर पडले होते त्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने सत्ता स्थापन केली आहे. तेव्हापासून शिवसेना नेमकी कोणाची याबाबत न्यायालयीन लढा सुरू आहे.अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. तर काही जुने शिवसैनिक अद्यापही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून सध्या अनेक शिवसैनिक मुंबई येथे जाऊन उद्धव ठाकरे यांना आपण तुमच्याबरोबर असल्याची ग्वाही देत आहेत. तसेच शिवसेना पुन्हा त्याच ताकतीने उभा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे सुद्धा प्रयत्न करत असून राज्यातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आज अहमदनगर शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
नगर शहर शिवसेनाप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फ़ुलसौंदर, युवासेना प्रमुख विक्रम राठोड, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगरसेवक अनिल बोरुडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक श्याम नळकांडे, नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेवक सचिन शिंदे ,माजी नगरसेवक अभिषेक कळमकर, अशोक दहिफळे, आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
लवकरच नगर शहरामध्ये एक विराट सभा आयोजित करण्यात येणार असे आश्वासन पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांनी दिले. नगरशहरात शिवसेना पक्ष आजुन बळकट करण्यासाठी जोरदार तयारीला लागावे असेही उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास गेलेल्या पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना सांगितले. या वेळी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, महिलाआघाडी, युवासेना, वाहतूक सेना, शिवसैनिक उपस्थित होते.