अहमदनगर दि.२९ मे
कुस्ती स्पर्धा आयोजित करणे हे काही सोपे काम नाही. अनेक अडथळ्यांची शर्यत त्यासाठी पार करावी लागते. नगर सारख्या शहरात तर अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे म्हणजे खूपच मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करणे आहे. ती पार करत या स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यामध्ये किरण काळे विजयी झाले, असे म्हणत आगामी काळात देखील नगर शहरामध्ये काळे विजयी होतील असा आशावाद महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. वाडीया पार्क मैदानात रंगलेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली.
किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा नगरमध्ये पार पडल्या. महिला व पुरुष गटाच्या अंतिम लढतीसाठी महसूल मंत्री ना.थोरात यांच्यासह क्रीडामंत्री ना. सुनील केदार, आ.डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे कुस्तीगीर परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष काका पवार, पै.वैभव लांडगे, हिंद केसरी पै. योगेश दोडके, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, दशरथ शिंदे, पै.संभाजी लोंढे, हर्षवर्धन कोतकर, संग्राम शेळके आदींसह नगर शहरासह नगर तालुका व जिल्ह्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, किरण काळे दुःखात असल्यामुळे स्पर्धा कशी होणार अशी काळजी होती. मात्र काळे यांनी तयार केलेल्या शहरातील नव्या दमाच्या फळीने त्यांच्या मागे स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष किरण काळे यांचे बंधू सागर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही स्पर्धेत व्यत्यय येऊ न देण्याची सूचना स्वतः किरण काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्पर्धा यशस्वी पार पडली. महसूलमंत्री थोरात व क्रीडामंत्री केदार यांनी काळे यांचे नेतृत्व यांचे यावेळी तोंड भरून कौतुक केले.
क्रीडामंत्री केदार म्हणाले की, कुस्ती स्पर्धा हा चांगला उपक्रम आहे. पक्ष संघटनेला याचा उपयोग होईल. यामुळे नवीन विचार मिळणार आहे. किरण काळे म्हणजे “बोले तैसा चाले” या प्रमाणे वागणारे धडाडीचे नेतृत्व आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी काळे हे नगरकरांच्या गळ्यातील ताईत बनले असून ते नक्कीच नगर शहरात येणाऱ्या निवडणुकीत शहराचे आमदार होतील असे आपल्या प्रास्ताविकात म्हटले. ना.थोरात यांनी देखील त्याला पुष्टी देत भव्य कुस्ती स्पर्धा आयोजनात यशस्वी झालेले काळे आगामी काळात प्रत्येक गोष्टीत विजयी होतील असे म्हणत जोरदार राजकीय बॅटिंग केली.
यावेळी कै. सागर काळे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी किरण काळे युथ फाऊंडेशन, जिल्हा तालीम संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अहोरात्र यांनी परिश्रम घेतले.
मैदानी कुस्ती बरोबरच राजकीय कुस्तीची देखील जोरदार चर्चा :
या स्पर्धेच्या माध्यमातून नगर शहराच्या स्थापना दिनी जरी कुस्त्यांचा फड ऐतिहासिक वाडीया पार्कच्या स्टेडियममध्ये रंगला असला तरी देखील या स्पर्धेची राजकीय वर्तुळात सुरुवातीपासूनच मोठी चर्चा शहरात सुरु होती. विशेष म्हणजे छञपती शिवाजी महाराजांच्या नावाने एवढी भव्य स्पर्धा शहरात होत असताना नगर शहर विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांना आणि माजी आमदार वडिलांना मात्र या स्पर्धेच्या व्यासपीठावर किरण काळे युथ फाउंडेशनने कोणतेही स्थान दिले नाही. त्यांच्या आयुर्वेद कार्यालयाच्या बालेकिल्ल्यात नामांकित मल्लांनी एकमेकांना कुस्तीच्या आखाड्यात चितपट केल्याचा अनुभव कुस्तीप्रेमिंनी घेतला. तर नगर शहराच्या राजकीय आखाड्यात मात्र शहराच्या आमदारांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सक्षम नेतृत्वाची चुणूक दाखवत किरण काळे यांनी चितपट केल्याची कुजबुज उपस्थितांमध्ये चांगलीच रंगली होती.
पुरूषांमध्ये सदगीर विजेता :
रू. ५ लाख व चांदीच्या गदेसाठी भारत केसरी विजेता पै. शुभम शिराळे आणि महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर यांच्यात चुरशीची लढत झाली. यावेळी उपस्थित कुस्ती प्रेमींचा श्वास रोखला गेला होता. मात्र यामध्ये हर्षवर्धन याने शुभम याच्यावर चार गुणांनी विजय मिळवीत विजय खेचून आणला. दोन्ही मल्लांनी विजेतेपदासाठी लढत दिली. मात्र गुणांच्या आधारावर सदगीर विजेता होत त्याने रोख रु. ५ लाख आणि मानाची पै. छबुराव लांडगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आलेली चांदीची अडीच किलोची गदा पटकावली. यावेळी वाडीया पार्क स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या हजारो कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला.
महिलांमध्ये माने विजेती :
महिला कुस्त्या हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण होते. महिलांमध्ये कोल्हापूरची शिवछत्रपती पुरस्कार विजेती रेश्मा माने आणि सांगलीच्या प्रतिक्षा बागडे यांच्यात चुरशीची लढत झाली. माने हीने या अटीतटीच्या कुस्तीत बागडेला चीतपट करीत पराभव केला आणि मानाच्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेत तीन गुणांनी विजय मिळवीत रु. १ लाख रोख आणि कै. पै. शकुर चुडीवाला यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली चांदीची गदा पटकावली.
विजेत्यांना इन कॅमेरा रोख बक्षिसांचे वाटप :
कुस्ती स्पर्धा म्हटली की जाहीर केलेली बक्षिसांच्या रकमा विजेत्यांना पूर्ण न मिळण्याच्या तक्रारी अनेकदा होत असतात. या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील अंतिम विजेत्याला पूर्ण बक्षीस रक्कम न मिळाल्याची चर्चा राज्यावर झाली होती. मात्र किरण काळे यांनी याबाबत अत्यंत पारदर्शक धोरण ठेवत सर्व विजेत्यांना बक्षिसाची देण्यात आलेली एकूण रु. १६.५० लाख ही सर्वांच्या समोर जाहीरपणे देत ती इन कॅमेरा दिली आणि त्यांना ती मोजून घेत आपल्याला पूर्ण रक्कम मिळाली असल्याची खात्री करून घ्यायला लावली. यामुळे कुस्ती विजेत्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. काळे यांनी दाखविलेल्या पारदर्शकतेचे सर्वांनी कौतुक केले.