अहमदनगर
नायलॉन व जीवघेण्या चिनी मांजापासून दुचाकीस्वारांना पतंगांच्या दिवसात संरक्षण मिळावे त्याचबरोबर रस्तालुटीच्या प्रकरणात काही ठिकाणी आडव्या तारा बांधल्या जातात यापासूनदेखील संरक्षण मिळावे म्हणून येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित संशोधक शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी दुचाकीच्या हँडलला लावण्यासाठी ” लाइफ रॉड ” व दुचाकीस्वाराच्या गळ्याला लावण्यासाठी ” कॉलर जॅकेट ” तयार केले असून यामुळे अनेक अपघात टळून जीवितहानी होणार नाही तसेच या दोन्ही संकल्पनांच्या निर्मितीचे पेटंट ,ट्रेडमार्क, कॉपीराइट तसेच आय.एस.ओ. प्रमाणीकरण व अधिकार जगभरातील दुचाकी निर्मिती कंपन्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत देण्याचे डॉ. बागुल यांनी जाहीर केले आहे.
२०० ग्रॅम वजनाचा लाईफ रॉड हा साधारणत: दीड ते दोन फुटांचा धातूचा पोकळ पाईप असून यावर रात्री चमकणारे रेडियम डकवण्यात आले आहे .त्यावर मांजा अडकुन तूटण्यासाठी अणकुचीदार खाचा देखील तयार करण्यात आल्या आहेत.रॉड वॉटरप्रुफ असून दुचाकीस्वाराचा डाव्या बाजूच्या आरशाच्या नटबोल्टमध्ये हा रॉड काही सेकंदांमध्ये सहजपणे बसवता येतो व काढताही येतो. यासाठी अंदाजे खर्च १३० रुपये येतो.
कॉलर जॅकेटमध्ये हाय डेन्सिटी पॉलिप्रॉपीलीन या प्लास्टिकसदृश्य पण मजबूत पदार्थ तसेच हीटलॉनचा वापर करण्यात आला असून घातक मांजाने ते कापले जात नाही. यास छातीकडील व चेहऱ्याच्या हनुवटीकडील भागास सपोर्टर लावण्यात आलेले आहेत.हेल्मेट घातल्यानंतर गळ्याचा जो भाग उरतो तेवढ्या भागावर हे कॉलर जॅकेट लावता येईल.यावर देखील मांजा अडकून तुटण्यासाठी खाचा करण्यात आलेल्या आहेत.त्याचे वजन ७० ग्रॅम असून वॉटरप्रूफ आहे.अंदाजे खर्च ३० रुपये येतो.
डॉ. बागूल यांच्या या दोन संशोधनांच्या संकल्पनांनुसार उद्योजक निलेश पठारे ,उद्योजक सुनील मोरे व उद्योजक जिम्मी वधवा यांनी डॉ. बागुल यांना वस्तू संशोधन निर्मितीत महत्त्वाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
भारतातील हिरो, होंडा , सुझुकी,बजाज , ओला , यामाहा , जावा , केजीएफ , केटीएम , टीव्हीएस , महिंद्रा , रॉयल इन्फिल्ड , अथर एनेर्जी यासारख्या मातब्बर दुचाकी कंपन्यांबरोबरच सुमारे 33 देशांतील 150 प्रकारच्या दुचाकी निर्माण करणाऱ्या कंपन्यांना बागुल यांनी हे संशोधन ऑनलाइन पाठवले असून नवीन दुचाकी विकत घेतानाच ग्राहकाला इतर ॲक्सेसरीजबरोबर दुचाकीबरोबर हा लाइफ रॉड आग्रहाने देण्यात यावा व पतंग महोत्सवानुसार ग्राहकांनी वापरावा,असे आवाहनही त्यांनी सदर कंपन्यांना केले आहे. नायलॉन व चिनी मांजा वापरण्यास प्रतिबंध विषयक शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच समाजामध्ये लोकजागृती होण्याकरिता ऑनलाईन सेमिनार,वेबीनार देखील डॉ.बागुलआयोजित करणार आहेत.
भारतातील तसेच जगभरातील दुचाकी निर्मिती रचना व डिझाईन करणाऱ्या “कोड ऑफ व्हेईकल डिझाईन” (वाहन रचना आरेखन संहिता अधिनियम) आस्थापने यांना देखील नवीन दुचाकी रचना आरेखन करताना या रॉडचा आग्रहाने समावेश करावा असे आवाहन डॉ. बागूल यांनी केले आहे.तसेच नितिन गडकरी(केंद्रीय रस्ते ,वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री) ,ॲड अनिल परब(परिवहन व संसदीय कार्यमंत्री) तसेच सतीश पाटील( राज्यमंत्री गृह , शहरे , गृहनिर्माण , परिवहन , माहिती-तंत्रज्ञान , संसदीय कार्य , माजी सैनिक कल्याण),रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,आर टी ओ-मोटार वाहन विभाग -महाराष्ट्र,आदी ठिकाणी देखील हे संशोधन ऑनलाइन पाठवले आहे.