अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पोलीस दलात अहोरात्र प्रामाणिक सेवा बजावत,खाकी वर्दीची प्रतिष्ठा जपत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा गौरव होणे,हा केवळ पोलीस दलासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असतो.अशाच एका सुवर्णक्षणाचा साक्षीदार अहिल्यानगर जिल्हा ठरला आहे.महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘अति उत्कृष्ट सेवा पदक २०२६’ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्तव्यकठोर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिवाजीराव थोरात आणि धडाडीचे पोलीस हवालदार राजू आप्पासाहेब सुद्रिक यांना जाहीर होऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रदान करण्यात आला.पोलीस मुख्यालय,अहिल्यानगर येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव करण्यात आला.
*२५ वर्षांची निष्कलंक सेवा आणि गुन्हेगारांवर वचक सपोनि.हेमंत थोरात यांनी..*
आपल्या प्रदीर्घ २५ वर्षांच्या पोलीस सेवेत कर्तव्य,निष्ठा आणि कायद्याचे राज्य अबाधित ठेवणाऱ्या सपोनि. हेमंत थोरात यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात एक धाडसी अधिकारी म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे. स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) कार्यरत असताना त्यांनी अनेक गुंतागुंतीचे खून,आंतरराज्यीय दरोडे,खंडणी,तसेच संघटित गुन्हेगारीच्या किचकट गुन्ह्यांची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अचूक कौशल्याने उकल केली.गुन्हेगारांवर कठोर वचक निर्माण करतानाच सर्वसामान्य जनतेला तत्पर न्याय मिळवून देण्याची त्यांची कार्यपद्धती कौतुकास्पद ठरली आहे. त्यांच्या याच निस्वार्थ व निष्कलंक सेवेची दखल घेऊन त्यांना या सर्वोच्च पदकाने सन्मानित करण्यात आले.
*१५ वर्षांची निष्ठा आणि कौशल्याचा गौरव..*’पोलीस महासंचालक पदका’ नंतर लगेच अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान*
हवालदार राजू सुद्रिक यांनी पोलीस दलात तळागाळात काम करताना गुप्त माहितीचे अचूक जाळे आणि तांत्रिक तपासात निष्णात असलेले हवालदार राजू सुद्रिक यांनी आपल्या १५ वर्षांच्या सेवेत कर्तव्याची नवी व्याख्या निर्माण केली आहे.त्यांना नुकतेच मानाचे *’पोलीस महासंचालक पदक’* मिळाले होते आणि आता पुन्हा अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे *’अति उत्कृष्ट सेवा पदक’* या पुरस्काराने त्यांना 15 ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात आले आहे.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रदीर्घ सेवा बजावताना त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना जबरी चोऱ्या, घरफोड्या, दरोडे आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना गजाआड करण्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे.त्यांच्या धाडसी कामगिरीमुळे यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले असून,आता मिळालेल्या ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’मुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.पोलीस दलासह जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव या दोन्ही कर्तव्यदक्ष जवानांच्या सन्मानाने अहिल्यानगर पोलीस दलाची मान संपूर्ण राज्यात उंचावली आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह,सहकारी कर्मचारी,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून सपोनि.हेमंत थोरात आणि हवालदार राजू सुद्रिक यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





