अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर साउंड, लाईट व जनरेटर असोसिएशनच्या वतीने साउंड व्यवसायाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सिद्धीबाग, संबोधी विद्यालयाजवळ ही बैठक होणार असून सर्व साउंड, लाईट व जनरेटर व्यवसायिक मालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक उत्सवांमध्ये वाढता ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न, प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाया आणि काही जणांकडून होणाऱ्या नियमबाह्य वापराच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत प्रेशर मिड, प्लाझ्मा साउंड आणि धोकादायक लेसर यांचा वापर बंद करण्याबाबत सामूहिक निर्णय घेतला जाणार आहे.
तसेच प्रशासनाने निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादा, परवानगी व इतर नियमांचे काटेकोर पालन करूनच स्पीकर व बेसचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व साउंड मालकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करून तिची अंमलबजावणी करण्याबाबतही चर्चा होणार आहे.
काही व्यक्तींच्या नियमबाह्य कृत्यांमुळे संपूर्ण साउंड व्यवसाय अडचणीत येऊ नये, यासाठी सर्वांनी एकजूट ठेवून शिस्तबद्ध व्यवसाय करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला जाणार आहे. प्रशासनाशी समन्वय साधून व्यवसाय कायदेशीर, सुरक्षित व दीर्घकाळ टिकवण्यासाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे.
बैठकीतील प्रमुख मुद्दे
🚫 प्रेशर मिड बंद
🚫 प्लाझ्मा साउंड बंद
🚫 धोकादायक लेसर बंद
✅ नियमबद्ध स्पीकर व बेस वापर
✅ प्रशासनाच्या नियमांचे पालन
✅ व्यवसाय संरक्षणासाठी एकजूट
महत्त्वाची सूचना
बैठकीस फक्त साउंड, लाईट व जनरेटर व्यवसायाचे मालक यांनीच उपस्थित राहावे, असे असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
“आज नियम पाळूया, उद्या आपला व्यवसाय वाचवूया!” हा संदेश देत सर्व संबंधित व्यवसायिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



