अहिल्यानगर प्रतिनिधी |
अहिल्यानगर शहरातील सर्वोदय कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक तथा स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी सुरेश चिंतांबर यांनी आपली कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, दागदागिने व बँक ठेवींवर डोळा ठेवून संगनमताने फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, सुरेश चिंतांबर हे स्टेट बँक ऑफ इंडियामधून २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले असून त्यांना चार मुली आहेत. पत्नीच्या निधनानंतर आणि तीन मुली मानसिक आजाराने त्रस्त असल्याने ते अत्यंत असुरक्षित परिस्थितीत होते. याच काळात काही व्यक्तींनी मदतीच्या नावाखाली कुटुंबाचा विश्वास संपादन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, संबंधितांनी मुलींना उपचारासाठी विविध संस्थांमध्ये दाखल केले. त्यानंतर १० फेब्रुवारी २०२४ रोजी काही व्यक्तींनी सुरेश चिंतांबर यांना त्यांच्या राहत्या घरातून बाहेर नेऊन एका संस्थेत ठेवले. या काळात त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तोडण्यात आला होता. नंतर पोलिसांत तक्रार झाल्यानंतर ३ एप्रिल २०२४ रोजी त्यांना मुलीच्या ताब्यात देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
खोटे बक्षीसपत्र आणि साठेखताचा आरोप
सुरेश चिंतांबर यांनी दावा केला आहे की, त्यांच्या नावावरील सर्वोदय कॉलनीतील ‘आकांक्षा’ बंगला, शेजारील मोकळी जागा तसेच सावेडी येथील फ्लॅट याबाबत त्यांच्या बनावट सह्या करून खोटे बक्षीसपत्र आणि साठेखत तयार करण्यात आले. या व्यवहारांसाठी त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला उभे करून दस्तऐवज नोंदणी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सोन्या-चांदीसह दोन कोटींच्या मालमत्तेवर डल्ला?
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, घरातील अंदाजे १२५ तोळे सोन्याचे दागिने, ९ ते १० किलो चांदीची भांडी, रोख रक्कम, बँकेच्या लॉकरच्या चाव्या, डेबिट-एटीएम कार्ड, वाहन आणि महत्त्वाची कागदपत्रे गायब झाली आहेत. तसेच बँक खात्यातून सुमारे २६ लाख ८० हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
अनेकांविरुद्ध संगनमताचा आरोप
या प्रकरणात अॅडव्होकेट तेजस्वी तवले (कुलकर्णी), मेधा यादव, सचिन बारस्कर, प्रवीण बारस्कर, रंजना झिने, महेश पवार, ज्ञानेश्वर सोनार यांच्यासह इतरांवर संगनमताने फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, मालमत्ता बळकावणे आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपासाकडे लक्ष
कोट्यवधींची मालमत्ता, बनावट दस्तऐवज, बँक व्यवहार आणि ज्येष्ठ नागरिकाला कथितरीत्या संस्थेत ठेवण्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले असून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपासाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



