📰 खबर अहिल्यानगरची
अहिल्यानगर | प्रतिनिधी
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात खोटी कागदपत्रे तयार करून, बनावट व्यक्ती उभी करून साठेखत व इसार पावत्यांच्या माध्यमातून तब्बल १४ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेले माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे यांना पोलिसांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. या प्रकरणात शिंदे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी डॉ. अनिल आठरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार, घोडेगाव, खोसपुरी, पांढरी पूल, सावेडी तसेच लोणावळा परिसरातील वादग्रस्त जमिनी व प्लॉट दाखवून त्यांचे साठेखत व इसार पावत्या करण्यात आल्या. यासाठी बनावट व्यक्तींना मालक म्हणून उभे करून वारंवार आर्थिक व्यवहार करण्यात आले आणि त्यातून फिर्यादींकडून सुमारे १४ कोटी ६६ लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी पुरावे व आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून स्वप्नील शिंदे व त्यांच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध मोक्का लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या फसवणूक प्रकरणात स्वप्नील शिंदे यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी एका खून प्रकरणातही स्वप्नील शिंदे यांच्यावर मोक्का लागू करण्यात आला असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे अल्पावधीतच दुसऱ्यांदा मोक्काची कारवाई झाल्याने जिल्ह्यात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

📌 ठळक मुद्दे
१४ कोटी ६६ लाख रुपयांच्या कथित फसवणुकीचा आरोप
खोटी कागदपत्रे व बनावट व्यक्तींच्या माध्यमातून व्यवहार
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
स्वप्नील शिंदे व साथीदारांविरुद्ध मोक्का लागू
यापूर्वीच्या खून प्रकरणातही मोक्का लागू असल्याची माहिती.





