अहिल्यानगर
गुलमोहर रोडवरील महत्वाचा असलेला पारिजात चौकाचे नामकरण ‘राजर्षी शाहू महाराज चौक’ करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

महानगर पालिका प्रशासनाने पारिजात चौकास ‘पारिजात चौक’ असे अधिकृत नामकरण करण्यावावतचा विषय महासभेत ठेवण्यात आलेला आहे. या विषयास या परिसरातील नागरिकांनी हरकत घेतली असून, पारिजात चौकास ‘पारिजात चौक’ न करता ‘राजर्षी शाहू महाराज चौक’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे.
महानगर पालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केलेल्या मागणी नुसार गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही राजर्षी शाहू महाराज सेवाभावी प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून पारिजात चौक येथे विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत आहोत. यामध्ये गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव तसेच विविध महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेल्या पंचवीस वर्षांपासून या परिसरामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, महापुरुषांचे विचार, सामाजिक एकोपा व जनजागृती करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. त्यामुळे या चौकाला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देणे हे आमच्यासाठी केवळ नामकरण नसून, त्यांच्या सामाजिक कार्याचा व विचारांचा सन्मान ठरेल. राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण, सामाजिक समता, आरक्षण, बहुजनांचे उत्थान आणि सामाजिक न्यायासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पारिजात चौकास ‘राजर्षी शाहू महाराज चौक’ असे अधिकृत नामकरण करण्यात यावे. तरी महानगरपालिका प्रशासनाने महासभेत ठेवलेल्या नामकरणाच्या विषयाचा पुनर्विचार करून, आमच्या पंचवीस वर्षांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घ्यावी आणि पारिजात चौकास ‘राजर्षी शाहू महाराज चौक’ असे अधिकृत नामकरण करण्याचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज सेवाभावी प्रतिष्ठाण ट्रस्टच्या सदस्यांनी केली आहे.





