अहमदनगर दि.४ ऑक्टोबर :
आज सख्खी मुलं आईवडीलांच्या देवदर्शनाला नाके मुरडतात, अशा परिस्थितीत आ.निलेश लंके गेल्या सात वर्षांपासून लाखो महिलांना देवदर्शन घडवून माता-भगिनींचे आशीर्वाद घेत आहेत, पुराणात श्रावणबाळाने आपल्या माता-पित्यांचे देवदर्शन घडवून निर्माण केलेला आदर्श आज आ.लंके करत असल्याने त्यांना आजच्या युगातील श्रावणबाळ म्हणावे लागेल अशी कौतुकाची थाप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र निमित्ताने आयोजित यंदाच्या मोहटादेवी गडाचे महिला देवदर्शन कार्यक्रमाच्या समारोप फेरीच्या कार्यक्रमास मेहबूब शेख उपस्थित होते. लंके प्रतिष्ठान गेल्या सात वर्षांपासून पारनेर विधानसभा मतदारसंघात महिलांसाठी मोहटा देवी दर्शन यात्रेचे आयोजन करत आहे. कोरोनाकाळ वगळता अविरतपणे सुरू असलेल्या उपक्रमात आतापर्यंत लाखो महिलांनी मोहटादेवी दर्शनाचा लाभ घेतला आहे. यंदा कोरोनामुक्त वातावरण असल्याने मतदारसंघातील पारनेर, नगर तालुक्यातील सात जिल्हापरिषद गटातुन सव्वालाख महिलांचे दर्शन घडवण्यात आले. प्रत्येक गटातून तीनशे लक्झरी बसेस मधून फराळ,पाणी,वैद्यकीय सुविधा पथक आदी सेवा देत दोन हजार चारशे फेऱ्या लक्झरी बसेसच्या करण्यात आल्या. नवरात्राच्या आठव्या माळेला नगर तालुक्यातील महिला भक्तांना देवदर्शन करून यंदाच्या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम चांदबीबी महालाच्या पायथ्याशी करण्यात आला होता.
समारोप कार्यक्रमास उपस्थित असलेले राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आ.लंके यांच्या मतदारसंघातील उपक्रमाचे कौतुक केले. सध्याचे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार केवळ उत्सवी कार्यक्रम घेत असले तरी त्यामागे राजकीय मतांचे राजकारण दिसून येत असल्याचे सांगत कोणतीही निवडणूक नसताना आ.लंके न चुकता आपल्या मतदारसंघात मोहटादेवी दर्शनाचा राबवत असलेला उपक्रमातून ते आजच्या काळातले आधुनिक श्रावणबाळ असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आ.निलेश लंके यांनी आपण राजकारणापेक्षा समाजकारणात आवड असल्याचे सांगत माता-भगिनींच्या चेहऱ्यावरील समाधान महत्वाचे असल्याचे सांगितले. कोरोना काळात रुग्णसेवा, महिलांसाठआरामदायक देवदर्शन, युवक-युवतींसाठी रोजगार मेळावे आदी उपक्रम हे जनसेवेसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट: २०२४ ला आ.लंके हे खा.लंके होतील..
कार्यक्रमात एका महिलेने खा.लंके साहेब अशी आरोळी दिली, याचा धागा पकडत मेहबूब शेख यांनी मातभगिनींची ही साथ पहाता आता आ.लंके खासदार होणार असा विश्वास भाषणात व्यक्त केला, मात्र त्याचवेळी लंके यांनी मी आमदाराच बरा अशी टिप्पणी केली. मात्र असे असले तरी २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस साठी भरोषाचे उमेदवार म्हणून आ.लंके यांच्याकडे पाहिले जाते. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेत पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. लंके खासदार झाल्यास लंकेच्या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके या उमेदवार असतील असे बोलले जाते.
समारोप कार्यक्रमास प्रियांका लामखेडे, सुनीता धनवटे, जय लामखेड, शिवाभाऊ होळकर, संजय जयकर, अनुराधा कांडेकर सुनील नरवडे, नितीन कोतकर, हरिदास जाधव, बाबा काळे, नितीन भांबळ, अमोल काळे, दत्ता खताळ, सुनील कोकरे, सुदाम सातपुते, बबन डोंगरे, एकनाथ झावरे, बाळासाहेब पानसरे आदी उपस्थित होते.