अहमदनगर दि.३०सप्टेंबर
नगर शहरातील हिंस्त्र मोकाट कुत्र्यांना जीवे मारण्याचा प्रस्ताव काही नगरसेवकांनी सादर केला आहे. या प्रस्तावाचा निषेध करत वाघ्या फौंडेशनने
या प्राणीमात्राची हत्या करण्यास तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात फौंडेशनचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, शहरातील मोकाट हिंस्त्र कुत्र्यांच्या बाबतीत महानगर पालिकेच्या सभेत ‘नामी उपाय शोधण्यात आला. नगरसेवकांनी अकलीचे तारे तोडत नरभक्षक बाघ बिबटयाचे उदाहरण देऊन त्यांना जसं मारण्यात येतं तसं शहरातील हिंस्त्र कुत्र्यांना थेट जिवे मारण्याचा प्रस्ताव सादर केला. माणुसकी रसातळाला गेली आहे मान्य आहे पण हे अती होत आहे. वाघ अन् बिबट्या जंगलात असतो. तो शहरात आला तर हिंस्त्र होतो, पण कुत्री तर आधीपासून शहरात आहे. उदाहरण देताना तरी दर्जा असावा आणि आपण या बालीश उदाहरणावरून जर हे निर्णय घेत असाल तर धन्यच आहे. आपण या आधी सुद्धा नगरच्या मनामध्ये मोठे योगदान दिले आहे, पण आता आयुक्त पदाच्या कार्यकाळाला काळा डाग लागू देऊ नये.
हिंस्त्र कुत्र्यांच्या बाबतीत इतर उपाययोजना होऊ शकत नाही का? थेट जिते मारण्याचा मार्ग हा काही योग्य नाही. हे नगर शहर काय जगावेगळे शहर आहे का? फक्त नगरमध्येच कुत्री हिंस्त्र होतात? इतरठिकाणी यावर काय उपाय आहेत याचा अभ्यास करायला हवा. मतदार सांभाळायच्या नादात माणुसकीचा घोट घेणं सोपं आहे पण एकदा त्या मुक्या जनावरांचा देखील विचार करावा. मनपा कोणत्या गोष्टीत कमी पडत आहे याचा विचार करायला हवा. मोकाट कुत्र्यांची रेबीज चाचणी करून त्यांच्यावर उपचाराचे नियोजन, तसेच जास्तीत जास्त निर्बीजीकरणाकडे लक्ष दिले तर हे प्रमाण देखील कमी होऊ शकतं, पण फक्त कुणी तरी यावर काम करणं गरजेचं आहे पण या व्यतिरिक्त थेट जिव घेणे चुकीचे आहे.
मुंबई पुणे इतर ठिकाणी काय उपाययोजना आहेत, इतर प्राणी प्रेमी संघटनांना संपर्क साधावा पण हा आदेश तात्काळ रद्द करावा अन्यथा महानगर पालिकेच्या आवारात आम्ही प्राणी प्रेमी आत्मदहन करू, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राधिका रणभोर, रितेश रानमाळे, मयुरी बनकर, अंतरा हसे, वैशाली दगडे आदी उपस्थित होते. आयुक्त जावळे यांनी सांगितले की, आम्ही असे काही करणार नाही. यावर काही उपाय असेल तर प्राणीमित्रांनी संपर्क साधावा.