Home क्राईम नगर शहराच्या शांततेला गालबोट लावणाऱ्या समाजकंटकांचे कंबरडे मोडाच ….हातात धारदार शस्त्र घेऊन...

नगर शहराच्या शांततेला गालबोट लावणाऱ्या समाजकंटकांचे कंबरडे मोडाच ….हातात धारदार शस्त्र घेऊन दादागिरी नगर शहरात कशी चालू शकते..

अहमदनगर दि.१७ जानेवारी

अहमदनगर शहरात मकर संक्रांतीच्या सायंकाळी जे जे गल्ली घास गल्ली परिसरात दोन गटात तुफान राडा झाला आणि यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले. काही लोक या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या प्रकरणांमध्ये काही व्हिडिओ समोर आल्यानंतर धक्कादायक गोष्टी या व्हिडिओद्वारे दिसून येत आहेत. हातात धारदार शस्त्र घेऊन धमकवणारे लोक दगडफेकीसाठी फरशा फोडून छोटे छोटे तुकडे करून इतरांना प्रोत्साहित करणारे लोक या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत.विशेष म्हणजे तोंडाला रुमाल बांधून दगडफेक होत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.यामुळे अनेक शंका कुशंका उपलब्ध होऊ लागल्या आहेत.शहरामध्ये शांततेचे वातावरण असताना शुल्लक किरकोळ कारणावरून एवढी मोठी दगडफेक होणे हे निश्चितच गांभीर्याची बाबा आहे.

संक्रांतीचा सण हा विशेषतः महिलांचा सण म्हणून ओळखला जातो नवीन वर्षातला पहिलाच सण असल्याने आणि गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कोविड चे सावट असल्यामुळे यावर्षीचा संक्रातीचा सण चांगलाच उत्साहांमध्ये पार पडत असताना दगडफेकीची अनुचित घटना घडली सायंकाळी प्रत्येक घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो मात्र या दगडफेकीमुळे सर्वच कार्यक्रमावर विरजण पडले. तर या दगडफेकीमुळे शहरातील कापड बाजार लवकर बंद करावा लागला शहरातील अनेक दुकाने बंद करायला लागल्याने अनेकांचे नुकसान झाले. कापड बाजार मध्ये रात्री भरणारी चौपाटी म्हणजेच खाद्यपदार्थांच्या गाड्या लावू दिल्या नाहीत त्यामुळे रात्री साठी तयार करून ठेवलेले अनेक पदार्थ वाया गेले या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देणारे खरे गुन्हेगार कोण तर हे दगडफेक करणारे आहेत.

एखादी घटना घडली तर पोलीस तातडीने घटनास्थळी जातातच त्यावेळेस त्यांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काही कठोर गोष्टी कराव्या लागतात मात्र यामुळे पोलीस अधिकारी जातीवादी कधीच ठरू शकत नाही कारण त्याची वर्दी ही त्याला कधीच जातीय वादता करू देऊ शकत नाही मात्र पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करून त्यांचे खच्चीकरण करणे ही आज-काल फॅशनच बनले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून समाज कंटक असणारा तो कोणताही जाती व धर्माचा असो त्याच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. शहरात अशांतता माजवणाऱ्या या समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी सर्वच सामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.

गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी आणि त्यांची दहशत कमी करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी अशा गुन्हेगारांच्या धिंड काढल्या होत्या तशा धिंड नगर मध्ये निघाल्याच पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये कुणी अशी गुंडागर्दी आणि दादागिरी करून नगरची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार नाही ही काळाची गरज आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version