Home शहर शहरातील अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेचा दोन दिवसांचा अल्टीमेटम अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या...

शहरातील अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेचा दोन दिवसांचा अल्टीमेटम अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सक्त सूचना आयुक्त ॲक्शन मोडवर; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम

अहिल्यानगर – महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांवर सुरू केलेली कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमणधारकांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देत अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारपासून शहराच्या सर्व भागात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा ते चितळे रोड, नेता सुभाष चौक, कापड बाजार, मोची गल्ली, बालिकाश्रम रोड, उपनगरातील एकविरा चौक प्रोफेसर चौक, भिस्ताबग चौक, सक्कर चौक, मार्केट यार्ड परिसर, बोल्हेगाव, केडगाव, लिंक रोड, अंबिका नगर बस स्टॉप, कोठला स्टँड परिसर, झेंडीगेट, मुकुंदनगर, अकबर नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. तसेच, जिल्हा रुग्णालय समोरील गवळीवाडा येथे जनावरे रस्त्यावर सोडली जातात व रस्त्यावर बांधली जात असल्याचे दिसून आले आहे.

आयुक्त यशवंत डांगे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोमवारपासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांची अतिक्रमणे आहेत, त्यांनी ती दोन दिवसात काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिका कठोर कारवाई करेल, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे. अहिल्यानगर शहर अतिक्रमण मुक्त करून शहराची नवी ओळख निर्माण करण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version