Home Uncategorized चितळे रस्ता, चौपाटी कारंजा येथील पथविक्रेते, हातगाडी विक्रेत्यांचे स्थलांतर मानकर गल्ली...

चितळे रस्ता, चौपाटी कारंजा येथील पथविक्रेते, हातगाडी विक्रेत्यांचे स्थलांतर मानकर गल्ली पटांगणात सकाळी व दुपारच्या सत्रात तात्पुरत्या व्यवसायासाठी दिली जागा अतिक्रमणे हटवल्याने दिल्लीगेट ते चितळे रस्त्यावर दत्त बेकरीपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या मार्गी

अहिल्यानगर – शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. अशात दिल्लीगेट वेस ते चौपाटी कारंजा व तेथून चितळे रस्त्यावर अतिक्रमणांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत होती. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पुढाकार घेऊन तेथील अतिक्रमणधारक पथविक्रेते, हातगाडी विक्रेत्यांना मानकर गल्ली पटांगणात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिल्लीगेट ते चितळे रस्ता भागातील रहदारीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे.

दिल्लीगेट वेस, चौपाटी कारंजा व चितळे रस्ता हा कायम रहदारीचा रस्ता असून अतिक्रमणांमुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत होती. अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम होता. अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने नागरिकांना, वाहनचालकांना सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागत होते. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या प्रकरणात लक्ष घालून तेथील अतिक्रमधारक विक्रेत्यांना जवळच असलेल्या मानकर गल्ली पटांगणात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात तात्पुरत्या स्वरूपात ही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारपासून या विक्रेत्यांचे या जागेत स्थलांतर करण्यात आल्याने रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी मार्गी लागणार आहे.

दरम्यान, महानगरपालिका नेहरू मार्केटच्या जागेत भाजी मंडईसह व्यापारी संकुल उभारत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या माध्यमातून चितळे रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या काळात चितळे रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. दरम्यान, ज्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे, त्यांनी रस्त्यावर व्यवसाय केल्यास, महानगरपालिका कठोर कारवाई करेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version