अहमदनगर दि.५ डिसेंबर-
तणावपूर्ण जीवनशैली असणार्या पत्रकारांसाठी नियमित आरोग्य तपासणी गरजेची गोष्ट आहे. आपल्या कुटुंबीयांसाठी पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. तर मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या पत्रकारांच्या आरोग्य तपासणीच्या शिबीराचे कौतुकही केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या स्थापना दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद, अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डिजिटल मीडिया परिषद यांच्यावतीने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक ओला बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, हॉस्पिटलचे संचालक डॉ. शशीकांत फाटके, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विजय गव्हाळे, वसिम हुंडेकरी, डॉ. वैशाली काटकर, डॉ. प्रदिप जयस्वाल, डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ. महेश मुळे, डॉ. निलेश शेळके, डॉ. तुषार तनपुरे, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात विजयसिंह होलम यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्य जपण्याचे कार्य गेल्या दहा वर्षापासून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे. पत्रकारांचे आरोग्य जपण्यासाठी संपूर्ण राज्यभर शिबीर राबविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस स्वागत मन्सूर शेख यांनी केले. हाफ आयर्न मॅनचा बहुमान पटकाविणारे डॉ. महेश मुळे यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, आरोग्य ही मनुष्याची खरी संपत्ती आहे. त्याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजातील चांगल्या वाईट गोष्टींना प्रकाशात आणण्याचे काम पत्रकार करत असतात. सामाजिक आरोग्या जपण्याचे काम करणार्या पत्रकारांचे आरोग्य चांगले राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद सातत्याने पत्रकारांना एकत्र करून, त्यांच्या कुटुंबीयांसाठी चांगले उपक्रम राबवित आहे. तर त्यांच्या अडचणी देखील सोडविण्याचे काम करते. पत्रकार नेहमीच तणावपूर्ण वातावरणात काम करत असतो. स्पर्धेच्या डिजिटल युगात प्रत्येक बातमी कव्हर करताना त्याची शहानिशा करणे, वास्तुस्थिती पहाणे, त्यानंतर ती बातमी छापणे यामुळे त्याच्यावर मोठा ताण असतो. या तणावामुळे आजाराचे प्रमाण देखील वाढत आहे. शिबिराच्या माध्यमातून वेळोवेळी आरोग्य तपासण्या करुन गंभीर आजाराला तोंड देता येते. आरोग्याबाबत जागृक न राहिल्यास शेवटी संधी मिळणे देखील अवघड होऊन बसते. वेळोवेळी आरोग्य तपासण्या सदृढ आरोग्याचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. तर 24 कोटी रुपये खर्च करून बुरुडगाव येथे होत असलेल्या अद्यावत महापालिकेच्या प्रशस्त हॉस्पिटलची माहिती दिली व लवकरच शहर व उपनगरात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करुन त्याद्वारे आरोग्य सेवा महापालिकेच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे सांगितले.
डॉ. शशिकांत फाटके यांनी स्पर्धामय धकाधकीच्या जीवनात पत्रकारांनी आरोग्य जपणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी वेळेवर आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. गंभीर आजारांना सामोरे जाण्यापेक्षा वेळीच तपासणी करुन त्याचे निदान करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष गुंदेचा म्हणाले की, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पत्रकार चोवीस तास कार्य करत असतो त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होते. मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांचे आरोग्य जपण्यासाठी घेतलेला उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. जयस्वाल यांनी पत्रकारांना सुदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन करुन हृदयरोग व इतर आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम, योग्यवेळी सकस आहार व व्यसन टाळण्याचा सल्ला दिला. डॉ. वैशाली काटकर यांनी मेंदूच्या आजाराची माहिती दिली. डॉ प्राजक्ता पारधे यांनी आजार होण्याअगोदर तो तपासण्याद्वारे वेळीच रोखला जाऊ शकतो. आरोग्य संपत्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
इंम्पिरियल चौकातील अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराला पत्रकारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या. तर गरजेनूसार विविध वैद्यकिय चाचण्या निशुल्क करण्यात आल्या. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रथमोपचार औषधाच्या किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश जोशी यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.