अहमदनगर दिनांक १९ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील फकीरवाडा परिसरात चार जून रोजी दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदंल उरुस मिरवणुकीमध्ये मुघल सम्राट औरंगजेब याची प्रतिमा असलेले फलक झळकावण्याचा प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाल्या नंतर या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदंल उरुस मिरवणुकीमध्ये यातील चौघांनी संगनमताने मुगल सम्राट औरंगजेब याची प्रतिमा असलेले फलक हातामध्ये घेऊन प्रदर्शन करुन ‘बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन, द्वेष पसरेल असे कृत्य केले आहे. या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्य्द उर्फ सर्फराज जहागिरदार (रा. दर्गादायरा अ.नगर), अफनान आदिल शेख उर्फ खडा (रा.वाबळे कॉलनी अहमदनगर), शेख सरवर (रा.झेंडीगेट अ.नगर), जावेद शेख उर्फ गब्बर (रा.आशा टॉकीज चौक अ.नगर) यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 505 (2), 298, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या घटनेचे तीव्र पडसाद अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते संपूर्ण महाराष्ट्रातून या कृती विरोधात संताप व्यक्त करत या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत होती. या घटनेचे गांभीर्य ओळखत भिंगार पोलिसांनी सर्फराज शेख याचा हद्दपारचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता यावर आता शिक्कामोर्तब झाले असून विभागीय दंडाधिकारी यांनी सर्फराज याला दोन वर्षाकरिता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावी असा आदेश काढला आहे.