अहिल्यनगर दिनांक २६ डिसेंबर
महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी सर्वच पक्षांच्या बैठकीचा सीलसिला रोज सुरू आहे. अनेक दिवसानंतर महानगरपालिकेची निवडणूक लागल्यामुळे प्रत्येक पक्षातून उमेदवारी करण्यासाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र 68 जागा नगरसेवक पदासाठी असून इच्छुकांची संख्या हजारोंच्या वर गेली आहे.

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा युती आघाडी असताना नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी समोरासमोर उभा ठाकल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता महानगरपालिकेत सुद्धा अनेक ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवणार आहे. नगर शहरातही अद्याप महायुती मध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे महायुती होणार का नाही याच्या चर्चा सुरू आहेत. तर महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप पर्यंत जागा निश्चिती न झाल्यामुळे त्या ठिकाणीही संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.
महायुतीची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप हे सांभाळत आहेत तर भारतीय जनता पार्टी कडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील हे दोघेही प्रामुख्याने धुरा सांभाळत आहेत.
नगर शहरात काही निवडक पदाधिकारी आणि प्रभाग प्रमुखांची बैठक एका हॉटेलमध्ये घेण्यात आली होती त्या ठिकाणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या पदाधिकारी आणि प्रभाग प्रमुखांना संबोधित करताना आपल्याला निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची ताकद दाखवली लागेल मात्र त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद नगर शहरात जास्त असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.त्यामुळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून निवडणूक लढवणार नाही हे जरी स्पष्ट होत असले तरी शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.